केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा अर्थसंकल्पाविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. १ फेब्रुवारीला निर्मला सीतारमण यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो देशातली गरीबी दूर करण्याच्या अनुषंगानेच सादर केलेला अर्थसंकल्प होता असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर देशातल्या द्रुतगती महामार्गांचं जाळं कसं असणार आहे त्याचप्रमाणे त्यामागे सरकारचं धोरण काय आहे यावरही नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. देशाच्या अमृत काळातला हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामुळे देश प्रगतीपथावर जाईल असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे नितीन गडकरी यांनी?
नितीन गडकरी म्हणाले की यावेळच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी हा पायाभूत सोयी सुविधांना देण्यात आला आहे. या निधीमुळे पायाभूत सुविधा तर चांगल्या होतीलच शिवाय रोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि गरीबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल. रोजगाराच्या संधी या पायाभूत सुविधांच्या माध्यमांतून कशा निर्माण होतील यावर अर्थमंत्र्यांनी तसंच केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केलं आहे. आम्ही आता २६ असेल रस्ते तयार करत आहोत जिथे तुम्ही विमानाचं लँडिंगही करू शकता. नितीन गडकरी म्हणाले की आज आम्हाला ४० हजार कोटी रुपये हे टोलच्या माध्यमातून मिळतात. हे उत्पन्न येत्या काळात १ लाख कोटी रूपयांपर्यंत वाढणार आहे. NHAI चा तोटा कधीच होत नाही. रस्ते तयार करण्यासाठी आम्ही जी रक्कम वापरतो ती १५ वर्षांमध्ये वसूल होते असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?
माझ्या खात्याला अर्थसंकल्पात २ लाख ७० हजार कोटी रूपये मिळाले आहेत. त्यामुळे पायाभूत सोयी सुविधांवर भर देणं सोपं जाणार आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे ७० हजार कोटींची अॅसेट आहेत. येत्या काळात ऑटोमोबाइल क्षेत्रालाही आणखी चांगले दिवस येणार आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही साडेचार कोटी लोकांना नोकरी दिली आहे. तर साडेचार लाख नोकरीच्या आणखी संधी निर्माण होणार आहेत.
आर्थिक सर्वेक्षण पार पडलं त्यात हे सांगण्यात आलं होतं की २०१६ मध्ये ६ हजार किमीचे रस्ते बांधले गेले. मात्र २०२२ मध्ये हे प्रमाण १० हजार ४५७ किमी इतकं झालं. राष्ट्रीय महामार्गांचं प्रमाण गेल्या आठ वर्षांमध्ये ५५ टक्के वाढलं आहे असंही नितीन गडकरींनी सांगितलं. आज तकच्या बजेट कॉनक्लेव्हमध्ये नितीन गडकरींनीही हे भाष्य केलं आहे.