नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे गडकरी यांची बेधडक वक्तव्य करण्याची सवय निवडणूक काळात पक्षासाठी अडचणीची ठरणारी असल्याने भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्यावर निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याची मागणी पक्षातून पुढे आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गडकरी पुन्हा सक्रिय व प्रचारासाठी ते वेळ देणार असे जाहीर केले होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही त्यांच्या नागपूर दौऱ्यात गडकरी-फडणवीस- बावनकुळे यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाणार हे स्पष्ट करून गडकरी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार याचे संकेत दिले होते. राज्यातील प्रमुख नेते व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या काही नेत्यांनी गडकरी यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली आहे. हे सर्व होत असतानाच गडकरी यांनी नागपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनीही गडकरींच्या वक्तव्याचा आधार घेऊन भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला होता. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत खुलासा करावा लागला होता.‘गडकरींची बोलण्याची ती स्टाईल आहे’ असे सांगत फडणवीस यांनी बाजू सांभाळून घेतली होती.

हेही वाचा : “मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा”; ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटलेले नाही, उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. यामुळे ते अनेक वेळा चर्चेत असतात, अनेकदा त्यांना त्यांच्या याच सवयीमुळे पक्षश्रेष्ठींची नाराजीही ओढवून घ्यावी लागली आहे. गडकरींना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. त्यांची सर्वसमावेश प्रतिमा ही पक्षासाठी निवडणुकीत फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळेच गडकरी यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांच्या बेधकड वक्तव्यामुळे यात अडचणी येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नितीन गडकरी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रात भाजप वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक निवडणुकीत ते पक्षप्रचारात झोकून देतात. आगामी विधानसभा निवडणुकीतही पूर्ण क्षमतेने प्रचारात सहभागी होणार आहेत.तसे आश्वासनही त्यांनी दिले आहे. ते स्पष्टवक्ते आहेत, त्यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढणे चुकीचे आहे. – चंदन गोस्वामी, प्रवक्ते भाजप.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari controversial statement create trouble for bjp in campaigning print politics news css
Show comments