‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ ‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गुजरातमधील वडोदरामध्ये हा प्रकल्प सुरू करणार असल्याची केंद्र सरकारकडून गुरुवारी ( २७ ऑक्टोंबर ) घोषणा होण्याच्या साधारण तीन आठवड्यापूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहलं होते. त्यात टाटा सन्सच्या विविध प्रकल्पांच्या विस्तारासाठी नागपुरमधील मिहान येथील जागा सूचवण्यात आली होती.
“नागपुरमध्ये महाराष्ट्र सरकारने मिहान (मल्टि-मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट नागपूर) मध्ये SEZ तयार केले आहे. मिहानमध्ये मुबलक प्रमाणात SEZ आणि बिगर SEZ अशी जमीन उपलब्ध आहे, ज्या टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्तम आहेत,” असं नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
हेही वाचा : केरळ भाजपामध्ये नाराजीनाट्य! राज्य कोअर कमिटीत स्थान न दिल्यामुळे प्रदेश उपाध्यक्षांनी व्यक्त केली खदखद
मात्र, नितीन गडकरी यांनी लिहलेल्या पत्रानंतरही ‘टाटा एअर’ हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचं राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे असलेला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार नारायण राणे यांच्याकडे देण्यात आला होता. भाजपाच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतूनही गडकरींना वगळण्यात आलं आहे.
तर, काही दिवसांपूर्वी ‘खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,’ असं वक्तव्य गडकरींनी केलं होतं. मात्र, त्यानंतर सारवासारव करताना आपलं खाते कसे चांगलं काम करते. त्यामुळे अशा प्रकारे अर्थाचा अनर्थ केला जातो, असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं होतं.
पण, नितीन गडकरी सत्तेत असतानाही एका प्रकल्पासाठी थेट टाटांना समूहाला लिहलेल्या पत्राचा अर्थ काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं कारण कापूस पिकवणाऱ्या विदर्भात गेल्या दोन दशकांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. त्यातच मिहान येथे होणारा ‘टाटा एअर’ हा प्रकल्प बाहेर गेल्याने विदर्भातील तरुणांचा रोजगार हिरावला जाणार होता. तसेच, विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्लाही सुद्धा आहे. याचा फटका आगामी निवडणुकांत बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गडकरींनी टाट समूहाला लिहलेल्या पत्रात म्हटलं, मिहानमधील पायाभूत सुविधा, रेल्वे, हवाई आणि रस्त्यांशी संपर्क असल्याने कंपनीला होणारा फायदा आणि कंपनीसाठी लागणारा कामगार वर्ग मिळवून देण्याचे आश्वासन दिलं होतं. तसेचं, नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर समजलं जातं. त्यामुळे थेट ३५० जिल्ह्यांशी नागपूर जोडल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं होतं.
विदर्भ विकास परिषदेतील सदस्याने सांगितल्यानुसार, टाटा एअर बस प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी जमीन आणि पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी मिहानला भेट दिली होती. मात्र, त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायची होती की नाही, अथवा गुजरातला हा प्रकल्प कसा गेला, याबाबत माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.