नागपूर : नेते काहीच करीत नाहीत, नेत्यांना दूरदृष्टी नाही, त्यामुळेच विकास होत नाही, प्रयत्नही करीत नाही, अशी भावना सर्वसाधारणपणे राजकीय नेत्यांबाबत सर्वसामान्यांची आहे. त्याला कारणही नेतेच आहे, कारण विकासाबाबत, रोजगार निर्मितीबाबत विदर्भाचे चित्र नेत्यांबाबत हीच बाब अधोरेखित करणारी आहे. नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याला अपवाद ठरावे. एखाद्या प्रश्नाला समजून त्यांच्या मुळाशी जाऊन सोडवण्याचा प्रयत्न तरी ते करतात.
नागपूरच्या संत्रीला जागतिक बाजारपेठ मिळावी, त्यातून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांचे मागील दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहे. त्यात त्यांना किती यश आले हा वादाचा मुद्दा असला तरी प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत. व्हॅलेन्शियामधील संत्र्याची प्रजाती टॅन्गो ही विदर्भातील शेतकऱ्यांना समृद्ध करू शकते, अशी त्यांना आशा आहे, शुक्रवारी नागपुरात त्यांनी घेतलेली संत्री उत्पादकांची कार्यशाळा हा याच प्रयत्नाचा एक भाग मानली जाते.
विदर्भातील संत्री फक्त कागदावरच नव्हे तर खऱ्या अर्थांने जगप्रसिद्ध व्हावी, यासाठी गडकरींचे मागील तीन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत चविष्ट असणाऱ्या या संत्रीला जागतिक बाजारपेठेत मागणी आहे, पण त्यासाठी लागणारे विक्री कौशल्य व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे नसल्याने येथील संत्री स्थानिक बाजारपेठेत मातीमोल दराने विकली जाते. हे लक्षात आल्यावर त्यांनी संत्री निर्यातीसाठी प्रयत्न केले. काही अंशी त्याला यश आले, पण बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या सत्तासंघर्षामुळे गडकरींच्या प्रयत्नांना फटका बसला. पण ते स्वस्थ बसले नाहीत. संत्र्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचा दुसरा प्रयत्न त्यांनी मदर डेअरीच्या माध्यमातून ‘संत्रा बर्फी’चा यशस्वी प्रयोग केला.
रामदेवबाबांना नागपुरात आणून संत्री प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा आग्रह केला. तो एकच महिन्यापूर्वी सुरू झाल्याने त्याचे यश-अपयश मोजता येणार नाही, यात शेतकरी हित आहे की बाबांना लाभ पोहचवणे हा हेतू आहे हे कालांतराने स्पष्ट होईलच. पण आज तरी या प्रक्रिया केंद्रामुळे संत्र्याची मागणी वाढली आणि पर्यायाने दरही वाढले.
पण त्यानंतरही गडकरींचे संत्री प्रेम थांबले नाहीत. त्यांनी अलीकडेच युरोपातील स्पेन देशाच्या व्हॅलेन्शिया या शहराला संत्री उत्पादकांसह भेट देऊन तेथील शेतकरी संत्री उत्पादन कसे घेतात याची पाहणी केली. व्हॅलेन्शिया भागात एकरी ३० ते ३५ टन संत्रा घेतला जातो. (विदर्भात एकरी उत्पादन ५ टन ) तेथील ‘टँगो’ नावाची संत्री प्रजाती जगप्रसिद्ध आहे. तेथील संत्र्याच्या अर्थकारणामुळे शेतकरी समृद्ध झाले आहेत. याच ‘टँगो’चा प्रयोग विदर्भात करून येथील शेतकऱ्यांना समृद्ध कसे करता येईल, याचा ध्यास सध्या गडकरींनी घेतला आहे.
त्यासाठी त्यांनी नागपुरात संत्री उत्पादकांची कार्यशाळा घेतली. त्यांना ‘टँगो’ संत्र्याचे महत्व समजावून सांगितले. एखाद्या गोष्टीचे ‘मार्केटिंग’ कसे करायचे हे गडकरी जाणतात. त्याच पद्धतीने ते ‘टँगो’ चे मार्केटिंग करीत आहेत. स्पेनमधील एक छोटासा देश संत्री उत्पादनात जगप्रसिद्ध होऊ शकते, तर अडिच कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या विदर्भाला देखील संत्र्याचे पीक समृद्धी प्रदान करू शकते, असा त्यांना विश्वास वाटतो.
काहीना काही करीत राहणे हा गडकरींचा स्वभाव त्यांना स्वस्थ बसू शकत नाही, नागपूरची संत्री जगाच्या नकाशावर यावी यासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांना किती यश मिळते हे काळ ठरवेल पण शेतकऱ्यांसाठी काही तरी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसून येतो जो अलीकडच्या काळात दुर्मिळ होत चाललेला आहे.