चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता
नागपूर : मेट्रो (टप्पा -१),एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, सिम्बॉयसिस, नॅशनल लॉ स्कूल, मदर डेअरी,ट्रायपोर्ट, रस्ते, उड्डाण पुल आणि बरेच काही. ही आहे, गडकरींच्या पहिल्या पाच वर्षातील (२०१४ ते २०१९) नागपूरमध्ये केलेल्या विकास कामांची यादी. अनेक मोठे प्रकल्प व राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे नागपूरमध्ये जाळे विणून त्यांनी स्वत:ची ‘विकास पुरूष’ अशी प्रतिमा निर्माण केली. पण नागपूर विकासाचा हा वेग त्यांना दुसऱ्या पाच वर्षात ( २०१९ ते २०२४ ) कायम ठेवता आला नाही, मेट्रो टप्पा-२ च्या कामाचा अपवाद सोडला तर दुसरे कोणतेही मोठे प्रकल्प (रस्ते, उड्डाण पुल वगळता) नागपुरात सुरू झाल्याची नोंद नाही . त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या ‘विकास पुरूष’ या प्रतिमेचा कितपत फायदा होईल याबाबत साशंकता आहे.
२०१४ ची निवडणूक ही गडकरींची पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. त्याआधी नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. गडकरी यांनी त्यांच्या प्रचार तंत्राव्दारे काँग्रेस राजवटीतील अपयश लोकांपुढे मांडत नागपूर विकासाचे नवे मॉडेल लोकांच्या डोळ्यापुढे ठेवले. त्याला दाद देत नागपूरकर मतदारांनी त्यांच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले, त्यामुळे तब्बल २ लाख ८० हजारांहून अधिक अशा विक्रमी मतांनी ते नागपूरमधून विजयी झाले. प्रथमच खासदार झालेल्या गडकरी यांची केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागली. आणि पहिल्याच पाच वर्षात ( २०१४ ते २०१९) त्यांनी नागपुरात मेट्रो (टप्पा -१), एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, सिम्बॉयसिस, नॅशनल लॉ स्कूल, मदर डेअरी, ट्रायपोर्ट यासारखे मोठे प्रकल्प आणि राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था,, अनेक उड्डाण पुल, सिमेटचे रस्ते अशी अनेक कामे करून नागपूरचा चेहरामोहराच बदलवून टाकला.
आणखी वाचा-चंद्रकांत खैरे यांच्यासमोर आव्हान, पाचव्यांदा उमेदवारी
नागपूर हे झपाट्याने प्रगत होणारे शहर अशी ओळख निर्माण झाली. गडकरी म्हणजे ‘विकास पुरूष’ असे नागपूरकर म्हणू लागले. त्यामुळे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा गडकरी लोकांपुढे गेले तेव्हा पुन्हा एकदा त्यांना २ लाख १६ हजार मताधिक्यांने नागपूरकरांनी विजयी केले. पण २०१९ ते २०२४ हे दुसरे पाच वर्ष पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत फिके पडणारे ठरले. या पाच वर्षात नागपुरात मेट्रो रेल्वेचा टप्पा-२ , पायाभूत सुविधांची कामे सोडली तर विशेष मोठे प्रकल्प नागपुरातसुरू झाल्याची नोंद नाही. नाही म्हणायला सिंदी रेल्वेजवळील ड्रायपोर्टला गती आली. अनेक उड्डाण पुलांचे भूमिपूजन गडकरींनी केले. काहींची कामे अंतिम टप्प्यात आहे. काहीचे काम सुरू व्हायचे आहे. रिजनल सेंटर फॉर स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया, आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर, स्कायबस व अन्य अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली होती. फुटाळा तलावावर शेकडो कोटी रुपये खर्च करून रंगबेरींगी कारंजी सुरू केली होती. त्याचा गवगवाही खुप झाला, पण त्याचे लोकांर्पण काही होऊ शकले नाही. त्यामुळे आता गडकरी यांना दहा वर्षात त्यांनी केलेल्या घोषणांपैकी किती पूर्ण झाल्या हे सांगूनच नव्या घोषणा कराव्या लागतील, तरच त्यांची विकास पुरुषाची प्रतिमा कायम राहिल नाही तर तिच प्रतिमा त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
आणखी वाचा-अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द झाल्याचा निर्णय कुणाच्या पथ्यावर?
एक लाख कोटींची कामे केली – गडकरी
‘गेल्या दहा वर्षांमध्ये १ लाख कोटींची कामे नागपूरमध्ये झालीत. येत्या काळात नागपूर हे एज्युकेशन हब, एव्हिएशन हब आणि लॉजिस्टिक हब म्हणून नावारुपाला येईल, ‘गेल्या दहा वर्षांपासून मी या क्षेत्राचा खासदार आहे. या भागासाठी १ लाख कोटींची कामे केली. कोरोना काळात रेमिडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली खाटांची व्यवस्था केली. शंभर कोटींचे साहित्य रुग्णालयांना वितरित केले. केवळ नागपुरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात मदत केली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित केले,’ मदत करताना जात-पात बघितली नाही, असे गडकरी यांनी सांगितले. ते शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित नागपुरातील तरुणांशी संवाद साधताना बोलत होते.