बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षणाची गरज अधोरेखित करताना वादग्रस्त विधान केले. विरोधकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. या विधानामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी आता माफी मागितली आहे. असे असले तरी विरोधक नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार यांनी मागितली माफी

नितीश कुमार यांनी आज (८ नोव्हेंबर २०२३) सभागृहात केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले, तसेच माफी मागितली. “मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी फक्त महिला शिक्षणाबद्दल बोलत होतो. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो”, असे नितीश कुमार म्हणाले. मात्र, हे स्पष्टीकरण देत असताना भाजपाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. भाजपाचे आमदार नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. तसेच नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील या आमदारांकडून करण्यात आली.

नितीश कुमार नेमके काय म्हणाले?

बिहार सरकारने जात सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालावर बोलताना ते महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यावर बोलत होते. बिहारचा लोकसंख्या वाढीचा दर ४.२ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याच विषयावर भाष्य करताना नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन केले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहातील आमदारांमध्ये हशा पिकला. मात्र, या विधानावर भाजपाच्या काही महिला आमदारांनी आक्षेप घेतला.

सभागृहात भाजपाच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी

त्यानंतर मात्र भाजपाने हा मुद्दा लावून धरला. नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यात आली. आज सभागृहाबाहेरच भाजपाच्या आमदारांनी नितीश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली. त्यांना सभागृहात येऊ दिले जात नव्हते. मात्र, ते कसेबसे सभागृहात पोहोचले. त्यानंतर नितीश कुमार यांनी माफी मागितली. तसेच तुम्ही विनाकारण हे प्रकरण का वाढवत आहात? अशी विचारणादेखील त्यांनी भाजपाच्या आमदारांना केली.

“भाजपाच्या आमदारांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही”

भाजपाचे आमदार नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत असताना विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी त्याला विरोध केला. भाजपाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असे चौधरी म्हणाले. मात्र, तरीदेखील भाजपाचे आमदार घोषणाबाजी करत राहिले.

“ते शब्द चुकून निघाले”

दरम्यान, नितीश कुमार यांनी माफी मागितल्यानंतर राजद पक्षाच्या नेत्या तथा लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी, यांनी प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार यांच्या तोंडून ते शब्द चुकून निघाले. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणू नये. नितीश कुमार यांनी त्यांनी केलेल्या विधानाबाबत माफी मागितली आहे”, असे राबडी देवी म्हणाल्या. बिहारमध्ये महायुतीच्या रूपात राजद आणि जदयू हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar apologises on contradictory statement about population growth bjp demand resignation prd