मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी समाधान यात्रेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर मोठे विधान केलं केलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव घेतील असं ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नितीशकुमार यांच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
नितीश कुमार काय म्हणाले?
शनिवारी समाधान यात्रेदरम्यान नितीशकुमार यांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारण्यात आलं. ते म्हणाले, माध्यमांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तेजस्वी यादव यांना विचारायला हवं. महागठबंधनमधील पक्षांशी त्यांची चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा मंत्रिपदाचा कोटा ठरलेला आहे. मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी तेजस्वी यांची चर्च सुरू आहे. याबाबत काँग्रेसनेही माझ्याशी संपर्क साधला, पण मी त्यांना तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. मंत्रिमंडळाबाबतचा अंतिम निर्णय तेजस्वी यादव घेतील, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली होती.
हेही वाचा – यशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर लालू प्रसाद यादव सिंगापूरहून दिल्लीत दाखल, मुलगी मीसा भारतींच्या घरी वास्तव्य
विविध राजकीय चर्चांना उधाण
विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नितीशकुमार यांनी २०२५ मध्ये आपला उत्तराधिकारी तेजस्वी यादव असतील, असे घोषित केलं होते. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसून येत आहेत. त्यांच्या या विधानाचे विविध अर्थ काढण्यात येत आहेत. नितीशकुमारांच्या या विधानानंतर महगठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांचं वर्चस्व वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर जेडीयूच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूचे राजदमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जेडीयूचे राजदमध्ये विलीन होण्याच्या अटीवरच दोघे एकत्र आले असून त्यामुळेच हळूहळू तेजस्वी यादव नितीशकुमारांची जागा घेतील, असं ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी पुर्णिया येथे महागठबंधनची रॅली होणार आहे. त्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही.