शनिवारी बिहार दिवसाच्या निमित्ताने भाजपानं संपूर्ण भारतात ‘स्नेहमिलन’ कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं मूळच्या बिहारच्या पण सध्या राज्याबाहेर असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात केली आहे. पिवळा-भगवा स्कार्फ, टिळा व लिट्टी-चोखा अशा पारंपरिक पद्धतीनं लोकांचं स्वागत करण्यात आलं. पक्षानं ‘बिहार दिवस’चं निमित्त साधून लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला होता. संपूर्ण भारतात या दिवसानिमित्त ‘स्नेहमिलन’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

नोएडा येथे ‘स्नेहमिलन’मध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला.

नितीश कुमार लोकप्रिय

“मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बरी नाही. मात्र, येत्या निवडणुकांमध्ये एनडीएने निवडणुकीत बाजी मारली तरीही भाजपामधील कोणाचीही या पदी वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे”, असे समस्तीपूरचे सुजीत कुमार यांनी यावेळी म्हटले.
सुजीत यांच्या म्हणण्याला अजित यांनी दुजोरा देत “एनडीएला पुन्हा सत्ता मिळेल यात शंका नाही. मात्र, नितीश कुमारांचा मुलगी निशांतनेही राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत संभ्रम आहेच. परिणामी भाजपाला मुख्यमंत्रिपद मिळवणं तसं कठीणच आहे,” असे मत मधुबनी जिल्ह्यातील फुलपारस यांनी व्यक्त केले.

शनिवारी आयोजित केलेला कार्यक्रम हा भाजपानं संपूर्ण भारतात आखलेल्या कार्यक्रमांपैकीच एक होता. बिहार दिवस अर्थात बिहार राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा नेत्यांनी हिंदी, भोजपुरी, तसेच मैथिली भाषेत सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार सरकारच्या यशाचाही गौरव केला. लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल या त्यांच्या पक्षाला त्यांनी ‘जंगल राज’, असे म्हटले. या ‘जंगल राज’मुळेच राज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. बिहारमधील अनिवासी लोकांची संख्या सुमारे दोन कोटी असल्याचा अंदाज भाजपाचा आहे.

“१९९० ते २००५ च्या दरम्यान लालू प्रसाद यांच्या कार्यकाळात लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्यावेळी अपहरण, खून हे लोकांचे व्यवसाय बनले होते. त्याशिवाय राज्यात जातीय हिंसाचारही वाढत होता”, असे भाजपाचे पश्चिम चंपारण्य खासदार व माजी बिहार प्रदेशप्रमुख संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे.

“महामार्गाच्या विकासामुळे बिहार आणि नोएडादरम्यानचा प्रवास कमी वेळेत होऊ लागला. एनडीए सरकारच्या काळात पायाभूत सुविधांचा झालेला विकास दर्शविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे बॅनर बिहारमध्ये सर्वत्र लावण्यात आले होते”, असेही जयस्वाल यांनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाचा संपर्क क्रमांक, स्थानिक पत्ता आणि बिहारमधील त्यांच्या मतदारसंघाचे नाव, अशी सर्व माहिती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नमूद करून घेतली. या लोकांशी संपर्क साधून त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एनडीएला मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी या माहितीचा उपयोग नक्कीच होईल.

जयस्वाल यांनी, यावेळी पुढच्या छट पूजेच्या समारंभात सर्वांना त्यांच्या गावी भेट देण्याचे आवाहन केले. तसेच नितीश कुमार त्यांच्या सर्व प्रवासाची सोय करतील, असेही सांगितले. “तुमच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाइकांना एनडीए सरकारच्या काळात देश किती प्रगती करीत आहे याबाबत सांगा आणि मतदान करण्यास प्रोत्साहित करा, असेही ते यावेळी म्हणाले.

त्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीतामढीमध्ये सीतेचं मंदिर उभारण्याचं आश्वासनही गृहमंत्री अमित शहा आणि नितीश कुमार यांनी दिलं होतं. याची आठवणही या कार्यक्रमाच्या वेळी करून देण्यात आली.

यावेळी भाजपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात राम भजनाचेही आयोजन करण्यात आले होते. बिहार दिन साजरा करणारा भाजपा हा पहिला पक्ष आहे, असे नोएडाचे भाजपा नेते राज कुमार झा यांनी सांगितले.

“भाजपा बरोबर नसतानाही नितीश कुमार यांनी चांगली कामं केली आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल ते तर कळेलच. तेजस्वी यादव हेदेखील या पदासाठीचे दावेदार आहेत मात्र, नितीश कुमारांची युती अधिक बलाढ्य दिसते. निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं नाही, तर नितीश कुमार स्वत: मुख्यमंत्री होतील किंवा त्यांच्या जागी इतर कोणाची तरी निवड करतील. ते भाजपा नेत्यांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत”, असे मत १२ वर्षांपूर्वी नोएडा येथे स्थलांतरित झालेल्या श्रीराम कुशवाह यांनी व्यक्त केले.

ब्रिजेश महतो हे साधारण ४० वर्षांपूर्वी बारह येथून नोएडा येथे स्थलांतरित झाले आणि भाजपा साजरा करीत असलेल्या बिहार दिन या कार्यक्रमामुळे ते चांगलेच प्रभावित झाले. यावेळी त्यांनी ‘बिहारियों का कदर हो रही है, इससे वोट खिचायेंगे’ (बिहारच्या जनतेचा आदर होत आहे, यामुळे भाजपा मतं आकर्षित करणार), असं म्हणत हे पहिल्यांदाच घडत असल्याचं सांगितलं. “लालूंनी केवळ जातीय वाद केला; मात्र नितीश कुमार यांनी बिहारचा खरा विकास केला”, असेही ते पुढे म्हणाले. एकंदर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सामान्यांच्या प्रतिक्रियांवरून नितीश कुमार यांची लोकप्रियतादेखील शिगेला पोहोचली असल्याचे दिसून आले. याचा फायदा नितीश कुमारांना येत्या निवडणुकीत होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.