बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसीय दिल्ली दौर्यावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर एनडीएतील भाजपाचा मित्रपक्ष जेडी (यू) ने केंद्राच्या ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ धोरणाच्या या अनुषंगाने बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली. सोमवारी (३ मे) बिहारचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परंतु, या भेटीचा या मागणीशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी राज्यसभा खासदार के. सी. त्यागी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधानांशी झालेली भेट केवळ शिष्टाचार होती. मुख्यमंत्री त्यांच्या नियमित नेत्रतपासणीसाठी दिल्लीत आले होते आणि त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितला होता.”
परंतु, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, “आम्ही लोकसभेच्या चांगल्या जागा जिंकल्या तर राष्ट्रीय राजकारणात आपण महत्त्वाचे खेळाडू होऊ शकतो. विधानसभेत सध्या आमचे ४५ आमदार आहेत. जर नव्याने मतदान झाले तर ही संख्या लक्षणीयरीत्या वाढेल.” ते म्हणाले की, जेडी(यू) एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने होता. “एनडीए पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार दिसत असल्याने आम्ही बिहारमध्ये लवकर निवडणुकांची मागणी केली आहे. नितीश यांनी नेहमीच या कल्पनेचे समर्थन केले आहे, कारण यामुळे खूप पैसे वाचतील”, असे ते म्हणाले.
हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?
जेडी(यू) नेत्याने पक्षाच्या मागणीची वेळही फेटाळून लावली. “त्याचा वेळेशी काहीही संबंध नाही. आम्ही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील एक राष्ट्र, एक निवडणूक पॅनेललाही सांगितले होते की आम्ही या कल्पनेच्या बाजूने आहोत, ते रेकॉर्डवर आहे” असे त्यांनी सांगितले. जेडी(यू) चे प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले की, विरोधी पक्ष ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ कल्पनेला घाबरत आहेत.