शनिवारी (१३ जानेवारी) इंडिया आघाडीची दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वाची बैठक झाली. काही नेते वगळता आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख नितीश कुमार यांनी समन्वयकाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. सर्वांची सहमती होत नाही तोपर्यंत ही जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी ही भूमिका नेमकी का घेतली? नितीश कुमार यांच्या मनात नेमके काय आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सर्वसहमती झाल्याशिवाय हे पद स्वीकारणार नाही”

अनेक दिवसांपासून जेडीयू पक्षाकडून नितीश कुमार हेच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असे सांगितले जात होते. नितीश कुमार यांनी मात्र माझी कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही, असे वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. नितीश कुमार यांना संयोजकपद द्यावे, अशी मागणी केली जात होती. मात्र, आघाडीतील इतर घटक पक्षांनी त्याला विरोध केल्यामुळे आता नितीश कुमार यांनी सर्वसहमती झाल्याशिवाय हे पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

“हा काय केबीसीचा प्रश्न आहे का?”

गेल्या आठवड्यात काँग्रेसने नितीश कुमार यांच्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदारीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. इंडिया आघाडीसंदर्भात मोठे निर्णय घेण्यास काँग्रेसने घाई केली पाहिजे, असे जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. नितीश कुमार यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार, असे विचारल्यानंतर हा काय केबीसीचा प्रश्न आहे का, असे उत्तर देण्यात आले होते. तसेच काँग्रेसकडून एकीकडे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे आयोजन केले जात असताना जेडीयूकडून, इंडिया आघाडीकडून एखादी यात्रा काढण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यामुळेदेखील काँग्रेस आणि जेडीयूमधील मतभेद वाढले होते.

ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे नितीश कुमार नाराज?

जेडीयूच्या नेत्यांकडून नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत. त्यांच्याकडे समन्वयकाचे पद द्यावे, अशी भूमिका घेतली जात आहे. मात्र, तरीदेखील जोपर्यंत सर्वांची सहमती होत नाही, तोपर्यंत कोणतेही पद स्वीकारणार नाही, अशी नितीश कुमार यांची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी खरगे यांचे नाव पुढे केले गेले होते. त्यानंतर नितीश कुमार काहीसे नाराज झाले होते. त्यामुळेच आघाडीत कोणत्याही पदासाठी सर्वांची सहमती गरजेची आहे, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतलेली आहे.

काँग्रेसने सहमती घडवून आणावी; नितीश कुमार यांची भूमिका

इंडिया आघाडीत आणखी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची नितीश कुमार वाट पाहत आहेत. काँग्रेसने आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करावी आणि नितीश कुमार हेच समन्वयक पदासाठी योग्य आहेत, ते इतरांना सांगावे, अशी नितीश कुमार यांची इच्छा आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांनी समन्वयकाची जबाबदारी सध्या तरी स्वीकारलेली नाही, असे जेडीयूच्या एका नेत्याने सांगितले.

जेडीयूची आगामी रणनीती काय?

बिहारमध्ये नुकताच जातीआधारित जनगणनेचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानुसार बिहारमध्ये साधारण ३६.१ टक्के जनता ही अतिमागास प्रवर्गातील (ईबीसी) आहे. त्यामुळे ईबीसी वर्गाला आकर्षित करण्याचा जेडीयूकडून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी कर्पुरी ठाकूर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. २४ जानेवारी रोजी ठाकूर यांची जयंती मोठ्या स्तरावर साजरी करण्याचे नियोजन बिहार सरकारकडून केले जात आहे. भाजपाकडून राम मंदिर आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला जात आहे. याच प्रचाराचा सामना करण्यासाठी जेडीयूने स्वत:ची अशी रणनीती आखली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून ईबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेडीयूकडून कर्पुरी ठाकूर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar denied convenor post in india alliance what strategy of jdu prd
Show comments