बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (जदयू) पक्षात अस्थितरता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून आरजेडीचे नेते उपेंद्र कुशवाहा पक्ष तसेच पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. तसेच त्यांनी खुले पत्र लिहून १९-२० फेब्रुवारीला पाटणा येथे आरजेडीच्या सर्व नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. कुशवाहा यांच्या या भूमिकेनंतर जदयूनेदेखील कडक पवित्रा घेतलेला आहे. कुशवाहा यांना पक्षात योग्य ते स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या या कारवाया थांबवाव्यात, असे आवाहन जनता दल यूनायटेडचे वरिष्ठ नेते तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

ललन सिंह काय म्हणाले?

ललन सिंह यांनी उपेंद्र कुशवाहा यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. कुशवाहा सातत्याने पक्षाविरोधी विधानं करत असून ते योग्य नाही. पक्षाने त्यांना नेहमीच योग्य ते स्थान दिलेले आहे. मात्र तरीदेखील कुशवाहा अशी विधानं करत आहेत. कुशवाहा पक्षाचे फक्त एक आमदार आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही, असे ललन सिंह म्हणाले.

तसेच त्यांनी केंद्रीय संसदीय मंडळाच्या अध्यक्षपदावर भाष्य केले. अद्याप या पदासाठी कोणतीही निवडणूक झालेली नाही. मात्र उपेंद्र कुशवाहा पक्षासाठी चांगले काम करत असतील तर आम्ही त्यांना हे पद देण्याचा विचार करू शकतो, असेही ललन सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”

दरम्यान, ललन सिंह यांच्या विधानानंतर उपेंद्र कुशवाहा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मला सध्याच या विषयावर काही बोलायचे नाही. योग्य वेळी मी बोलेन. कुशवाहा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात बंड करून पक्षाच्या लेटरहेडवर एक पत्र लिहून पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर जदयू पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली.