गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करून एनडीएत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, रविवार (२८ जानेवारी) येथे बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नितीश कुमार रविवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा एनडीएच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेचा दावा?
पीटीआय या वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आपल्या आमदारांसोबत रविवारी सकाळी १० वाजता एक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते राजभवनात जाऊन आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर ते भाजपाच्या पाठिंब्यावर संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा करतील.
राजदच्या आमदारांचीही बैठक
रविवार असला तरी आत राज्यपालांचे सचिवालय कार्यालय सुरुच ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. दुसरीकडे सध्या नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील आपल्या आमदारांची एक बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाआघाडीतून बाहेर पडण्याचे ठरवल्यास राजदच्या आमदारांनी लोकांत जावे. पक्षाने केलेल्या कामांची माहिती जनतेला द्यावी, असे आवाहन तेजस्वी यादव यांनी आपल्या आमदारांना केलेले आहे.
राजदची भूमिका काय? तेजस्वी यादव यांनी आमदारांना सांगितले….
बिहारमधील महाआघाडी संपुष्टात आलीच तर राजदची भूमिका काय असेल, याबाबत तेजस्वी यादव यांनी आपल्या आमदारांना याआधीच सांगितलेले आहे. आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा सर्वस्वी नितीश कुमार यांचा आहे, त्यांनीच याबाबत स्पष्टीकरण द्यावे. नितीश कुमार यांच्याकडूनच आघाडीला कमकुवत बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. यामध्ये राजदचा कोणताही सहभाग नाही, असे आपल्या मतदारसंघात जाऊन सांगावे, असे तेजस्वी यादव यांनी आपल्या आमदारांना सांगितले आहे.
नितीश कुमारांना दिलेला पाठिंबा काढून घेण्याची काही आमदारांची भूमिका
नितीश कुमार यांना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, अशी राजदच्या काही आमदारांची भूमिका आहे. मात्र आघाडी संपुष्टात येण्यासाठी राजदच जबाबदार आहे, असा संदेश लोकांमध्ये जायला नको, असे तेजस्वी यादव यांना वाटते. “आपण जनतेत जाऊया. आम्ही आमचे १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी झगडत होतो. त्या दिशेने आमचे प्रयत्न चालू होते, असे लोकांना सांगूया,” अशी भूमिका तेजस्वी यादव यांची आहे.