बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करून नव्याने एनडीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपा आणि संयुक्त जनता दल (जदयू) या दोन्ही पक्षांत हालचाली सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपाच्या दोन नेत्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या रविवारी राजीनामा देणार?

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर २०२० साली अशाच प्रकारे जदयू आणि भाजपा एकत्र आले होते. आता पुन्ह एकदा नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या दोन नेत्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी नितीश कुमार आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ते पुन्हा नव्याने एनडीएच्या पाठिंब्यावर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. त्यानंतर भाजपा आणि जदयू पक्षाचे आमदार एकत्र येत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याची शक्यता आहे.

एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री

सूत्रांच्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपाकडून अतिमागास प्रवर्गातून (ईबीसी) येणाऱ्या रेणू देवी यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. २०२० मध्येही त्या उपमुख्यमंत्री होत्या. मुख्यमंत्रिपदासाठी दुसऱ्या नेत्याची अद्याप निवड झालेली नाही. दुसऱ्या मुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार मोदी यांचे नाव चर्चेत आहे. सध्या ते राज्यसभेत खासदार आहेत. नितीश कुमार यांच्या याआधीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. सुशीलकुमार मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय आदी नेते उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

दुसरा उपमुख्यमंत्री निवडणे अद्याप बाकी

“भाजपाकडून ओबीसी-ईबीसी किंवा ईबीसी-उच्च जातीचा नेता या सूत्रानुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी नेत्यांची निवड केली जाऊ शकते. या सूत्रानुसार रेणू देवी या उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी दुसऱ्या नेत्याच्या निवडीवर अद्याप एकमत झालेले नाही,” असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.

“नेतृत्वाचा निर्णय मान्य करू”

दरम्यान, सध्या घडणाऱ्या या राजकीय घडामोडींवर सुशीलकुमार मोदी आणि सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया दिली. केंद्रातील नेतृत्व जो निर्णय घेईल, त्या निर्णयाचे आम्ही पालन करू, असे या नेत्यांनी सांगितले. “राजकारणात कोणताच दरवाजा पूर्णपणे बंद झालेला नसतो,” असे सुशीलकुमार मोदी म्हणाले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनाही नितीश कुमार यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी यावर थेट उत्तर देण्याचे टाळले.

राजदच्या पडद्यामागून हालचाली

दरम्यान, सध्या जदयूकडे एकूण ४५ तर भाजपाकडे एकूण ७८ आमदार आहेत. या दोन्ही आमदारांची संख्या १२४ होते. बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा हा १२२ आहे. जदयू-भाजपा एकत्र आल्यास हा आकडा सहज पार होतो. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल (राजद) नितीश कुमार यांना एवढ्या सहजपणे सरकारची स्थापना करू देण्याची शक्यता कमी आहे. कारण राजद, डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्या आमदारांची संख्या ११४ आहे. त्यांना बहुमताचा आकडा पार करायचा असेल तर आणखी आठ आमदारांची गरज आहे. त्यामुळे राजद जदयूच्या काही आमदारांशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजदचे लालूप्रसाद यादव यांच्याकडून तसे प्रयत्न केले जात आहेत.

“आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही”

राजदचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार मनोज कुमार झा यांनी याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, असे मनोज कुमार झा म्हणाले. त्यामुळे आता आगामी काळात बिहारच्या राजकारणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.