काँग्रेसचा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’तील इतर घटक पक्ष आमच्याच पक्षाचा नेता पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी कसा योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात संयुक्त जनता दल (जेडीयू) हा पक्ष सर्वांत पुढे आहे. नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांचे नेतृत्व मान्य करावे, असे या पक्षातील अनेक नेते जाहीरपणे सांगत आहेत. विशेष म्हणजे नितीश कुमार हे राष्ट्रीय नेता असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मूळचा बिहारचा असलेला हा पक्ष उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथेही जाहीर सभा घेणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा श्रीगणेशा; वाराणसीत सभा
वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातील रोहानिया येथे नितीश कुमार जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी म्हणून जेडीयू पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच सभेतून जेडीयू २०२४ सालाच्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. मोदी यांच्या मतदारसंघात सभा घेऊन आमचे नेते नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न जेडीयूकडून केला जात आहे.
विरोधकांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांची सभा
मंगळवारी (१९ डिसेंबर) विरोधकांच्या इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. विरोधकांची ही पाटणा, बंगळुरू व मुंबईनंतरची चौथी बैठक आहे. या बैठकीत जागावाटप, तसेच आगामी रणनीतीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडीतील सर्वपक्षीय सभा आणि प्रचारनीतीवरही या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे यावरही या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते. या बैठकीनंतर पाच दिवसांनी जेडीयूने मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सभा घेण्यात येणार आहे.
आगामी काळात झारखंड, हरियाणा व महाराष्ट्र दौरा
जेडीयू पक्षाकडून नितीश कुमार हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीचीच एक रणनीती म्हणून या पक्षाने नितीश कुमार यांचा झारखंड, हरियाणा व महाराष्ट्र यांसारख्या राज्यांत दौरा आयोजित केलेला आहे. आगामी काही महिन्यांत नितीश कुमार या सर्व राज्यांत वेगवेगळ्या लोकांची भेट घेणार आहेत.
“… म्हणून वाराणसी येथे सभा”
या रणनीतीवर जेडीयू पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “आमच्या वाराणसी येथील सभेची जास्तच चर्चा होत आहे. नितीश कुमार यांनी याआधीही या भागात सभेला संबोधित केलेले आहे. आम्ही २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा श्रीगणेशा याच सभेतून करणार आहोत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतील अनेक मतदारसंघांची रचना, परिस्थिती वाराणसी या मतदारसंघाप्रमाणेच असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे त्यागी यांनी सांगितले. या सभेच्या माध्यमातून नितीश कुमार कुर्मीसमाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
नितीश कुमारांना फुलपूरमधून निवडणूक लढवण्याची विनंती
नितीश कुमार यांनी मोदी यांच्याविरोधात वाराणसी या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान भाजपाकडून दिले जात आहे. त्यावरही त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार हे वाराणसी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत. आमचा तसा कोणताही विचार नाही. मात्र, आमच्या उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी नितीश कुमार यांनी फुलपूर येथून निवडणूक लढवावी, अशी विनंती केलेली आहे. कारण- याच मतदारसंघातून समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी निवडणूक लढवली होती. याबाबत आम्ही सध्या तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. नितीश कुमार यांच्या या सभेवर भाजपाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजेच भाजपा आम्हाला घाबरलेली आहे,” असे के. सी. त्यागी म्हणाले.
जागावाटपावर सविस्तर चर्चेची अपेक्षा
१९ डिसेंबर रोजी होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीवरही त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही कोणालाही त्यांनी काय मत तयार करावे, हे सांगू शकत नाही. मात्र, एक गोष्ट फारच स्पष्ट झाली आहे की, विरोधकांच्या आघाडीत स्पष्टता येणे गरजेचे आहे. १९ डिसेंबर रोजी आम्ही पुन्हा एकदा भेटत आहोत. त्यामुळे या बैठकीत आमच्यात जागावाटपावर सविस्तर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. एक पक्ष म्हणून रणनीती आखण्यास आम्ही स्वतंत्र आहोत,” असेही त्यागी यांनी स्पष्ट केले.
जेडीयूची २९ डिसेंबरला बैठक
दरम्यान, विरोधकांची १९ डिसेंबर रोजी बैठक झाल्यानंतर जेडीयू पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची २९ डिसेंबर रोजी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीबाबतही त्यांनी माहिती दिली. “आम्ही आमच्यातील सामर्थ्य आणि मर्यादांचे मूल्यमापन करू. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे विरोधकांनी एकत्र राहणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित झालेले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमच्याशी संपर्क साधला याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आमची वाराणसी येथील सभा विरोधकांना एक दिशा देईल,” असे त्यागी म्हणाले.