बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपासह सरकार स्थापन केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच काँग्रेस आणि आरजेडीच्या दबावामुळेच नितीश कुमारांनी बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण केले, असे म्हटले होते. दरम्यान, या टीकेला आता नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी काहीही बरळतात असे ते म्हणाले, त्यामुळे बिहारमधील जाती आधारित सर्वेक्षणावरून श्रेयवादाची लढाई बघायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – उमेदवारांच्या यादीवरून काँग्रेसची टीका, समाजवादी पक्षानेही दिले प्रत्युत्तर; इंडिया आघाडीतील मतभेद आणखी वाढणार?

काय म्हणाले नितीश कुमार? :

“राहुल गांधी काहीही बरळतात. खरं तर बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण करण्याचा ठराव मी २०१९-२० मध्ये मंजूर केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने जाती आधारित सर्वेक्षण करण्यास नकार दिला, त्यामुळे मी पुढे येऊन बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही नऊ राजकीय पक्षांबरोबर बैठकाही घेतल्या होत्या. मुळात एनडीएमधून बाहेर पडण्यापूर्वीपासून मी जाती आधारित सर्वेक्षणाविषयी बोलत होतो”, असे प्रत्युत्तर नितीश कुमार यांनी दिले.

पुढे बोलताना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणांद्वारे दबाव आणला जात असल्याच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “तपास यंत्रणांकडून जी कारवाई सुरू आहे, ती जुन्या प्रकरणांशी संबंधित आहे, हा त्यांच्या कामाचा भाग आहे”, असे ते म्हणाले.

तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर :

यावेळी बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या १७ महिन्यांच्या कार्यकाळाची तुलना नितीश कुमार यांच्या १७ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाशी केली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी मी बिहारची सत्ता हाती घेतली, त्यावेळी तेजस्वी यादव लहान होते. २००६ नंतर मी अनेक विकासाची कामे हाती घेतली. २००६ पूर्वी बिहारमधील तरुणांना सरकारी नोकऱ्याही मिळत नव्हत्या, आम्ही सत्तेत आल्यानंतर तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या.”

हेही वाचा – २०२० पासून हेमंत सोरेन आरोपांच्या कचाट्यात; निवडणूक आयोगानेही केली होती अपात्रतेची शिफारस

राहुल गांधींनी केली होती टीका :

‘भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान पूर्णिया येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. “बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हे करावा, अशी मागणी आम्ही नितीश कुमार यांच्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकून सर्व्हे करून घेतला. पण, दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर दबाव आला. कारण भाजपाला या देशात जातनिहाय सर्व्हे करायचा नाही. या देशात दलित, आदिवासी, वंचित यांची संख्या किती? हे भाजपाला जाणून घ्यायचे नाही, त्यामुळे भाजपाच्या दबावापुढे नितीश कुमार झुकले. भाजपाने त्यांना मार्ग दाखविला आणि नितीश कुमार त्या मार्गाने चालू पडले”, असे राहुल गांधी म्हणाले होते. तसेच “बिहारची अवस्था अशी आहे की, मुख्यमंत्र्यांवर थोडासा दबाव पडला तरी ते यू-टर्न घेतात”, अशी बोचरी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar replied to rahul gandhi tejaswi yadav over issue of caste based survey spb