बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाशी युती केली आहे. याच युतीच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. एकीकडे नितीश कुमार यांचे सरकार स्थिरावत असताना दुसरीकडे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. नितीश कुमार हे अजूनही भाजपाच्या संपर्कात आहेत, असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत. दरम्यान, किशोर यांच्या याच विधानावर नितीश कुमार यांनी भाष्य केले आहे. प्रशांत किशोर यांचे माझ्यासमोर नाव घेऊ नका. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे विधान करत आहेत. मी आतापर्यंत ज्या लोकांना सन्मान दिलेला आहे. त्यांनी माझ्याशी योग्य व्यवहार केलेला नाही, असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
“मला त्यांच्याबद्दल (प्रशांत किशोर) काहीही विचारू नका. याआधीही मी हे सांगितलेले आहे. कोणालाही काहीही म्हणण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने ते अशी विधानं करत आहेत. कधीकाळी मी त्यांचा खूप सन्मान करायचो. मात्र आता ते काहीही विधानं करत आहेत. मी ज्यांना ज्यांना आदराचे स्थान दिलेले आहे. त्यांनी माझा अनादर केलेला आहे,” असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान
प्रशांत किशोर यांनी याआधी नितीश कुमार यांच्यासोबत काम केलेले आहे. नितीश कुमार यांनी निवडणूक जिंकावी म्हणून प्रशांत किशोर यांनी रणनीती आखली होती. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. याच कारणामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आलेले आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याबद्दल काहीही विचारू नका अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात एकनाथ शिंदे विरोधकांची मोट बांधणी सुरू; संजय घाडीगांवकर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाची रणनीती
प्रशांत किशोर काय म्हणाले होते?
“नितीश कुमार बिहारमध्ये महागठबंधनमध्ये नक्कीच आहेत, परंतु त्यांनी भाजपासोबतचे आपले संपर्क थांबवलेले नाहीत. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे खासदार हरविंश नारायण सिंह आहेत. ते जनता दल(यू)चे खासदार आहेत आणि ते अद्यापही राज्यसभेच्या उपसभापती पदावर कायम आहेत.” असे किशोर म्हणाले होते.