Will Nitish Kumar Deputy Prime Minister of India : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करण्यात यावं अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी बुधवारी (तारीख ९ एप्रिल) केली. नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी दिल्यास मला आनंद होईल, असंही ते म्हणाले. माजी मंत्र्याच्या या मागणीची सध्या संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांची खरंच उपपंतप्रधानपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे नेते राज्याचा दौरा करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३० मार्चला बिहारचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा केली. भाजपाच्या ८४ आमदारांनी पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं, असे निर्देश अमित शाहांनी दिले. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधान करण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाची नजर?

नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष (जनता दल युनायटेड) भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे नितीश कुमार यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने बिहारमध्ये ११५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ ४३ जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला. दुसरीकडे भाजपानं ११० जागा लढवल्या आणि ७५ उमेदवार निवडून आणले. मात्र, पक्षाने युतीधर्म पाळून नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. यंदा मात्र भाजपा मुख्यमंत्रिपदाचे लक्ष्य समोर ठेवूनच रिंगणात उतरेल अशी चिन्हे आहेत. गेल्या ११ वर्षांत भाजपानं उत्तर भारतात चांगलं बस्तान बसविलं आहे.

आणखी वाचा : BJP Strategy : मित्रपक्षांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाची रणनीती काय?

भाजपाची बिहारमध्ये नवी खेळी?

तब्बल २७ वर्षांनंतर दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकून पक्षाने राजधानीत स्वत:चा मुख्यमंत्री बसवला आहे. दिल्ली विधानसभेतील विजयानं भाजपाचा आत्मविश्वास आणखीच वाढला आहे. मात्र, असं असलं तरी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचं भाजपाचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला बिहारचं मुख्यमंत्रिपद मिळाल्यास पक्षाचं उत्तर भारतातील सत्तेचं वर्तुळ पूर्ण होईल, तसंच उत्तर प्रदेश व महाराष्ट्रापाठोपाठ सर्वात मोठं राज्य असलेल्या बिहारचं मुख्यमंत्रिपदही भाजपाकडं येईल. यादरम्यान नितीश कुमार यांची उपपंतप्रधानपदी वर्णी लावून बिहारचे मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेण्याची भाजपाची खेळी तर नाहीये ना? असा प्रश्न काही जण विचारत आहेत.

अश्विनी कुमार चौबे काय म्हणाले?

भाजपाचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार चौबे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी बुधवारी (तारीख ९ एप्रिल) बक्सरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. “नितीश कुमार यांनी बराच काळ एनडीएमध्ये समन्वयकाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करीत आहेत. नितीश कुमार यांच्याकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी दिल्यास ती बिहारसाठी अभिमानाची गोष्ट असेल, कारण जगजीवन राम यांच्यानंतर बिहारला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळेल. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं चौबे यांनी म्हटलं. “नितीश कुमार यांच्यासाठी कोणतेही पद मोठं राहिलेलं नाही. गेल्या २० वर्षांपासून ते आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये उपपंतप्रधान म्हणून स्थान मिळवावे, असंही चौबे म्हणाले.

भाजपा नेत्याच्या विधानावर जेडीयूची प्रतिक्रिया

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या या विधानाची सध्या बिहारसह संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केलंय की, आगामी बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आशेने पाहते आणि भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना याची जाणीव आहे”, असं जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच सीएनएन- ‘न्यूज १८’च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठं भाकीत केलं. “आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जनादेशाने विजयी होईल. एनडीएला विक्रमी बहुमत मिळेल आणि राज्यात पुन्हा आमचीच सत्ता असेल. बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षातील नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा अपप्रचार केला होता, त्यामुळे भाजपाला नुकसान सहन करावं लागलं. मात्र, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला,” असं अमित शाह म्हणाले होते.

हेही वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी कसं शांत केलं?

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का?

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळाल्यास नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. दरम्यान, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच द इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर मोठं भाकीत केलं. “विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ढासळणारी तब्येत आणि त्यांच्या नेतृत्वावर राज्यातील मतदारांना शंका आहे. ज्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल, तेव्हा ते प्रकृतीच्या कारणास्तव शक्यतो सार्वजनिक सभांना संबोधित करू शकणार नाहीत”, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत प्रशांत किशोर काय म्हणाले?

मध्यंतरी प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या प्रकृतीविषयी बोलताना भाष्य केलं होतं. “नितीश कुमार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. ते दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय त्या जिल्ह्याचे नावही सांगू शकत नाहीत. नितीश कुमार यांच्यासारखा नेता बिहारचा मुख्यमंत्री आहे, हेच राज्याचे मोठे दुर्दैव आहे”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती. “आगामी निवडणुकीत भाजपाने जर नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं, तर त्यांना आमदार निवडून आणणं अवघड होईल. नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली असल्यामुळे एनडीएकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास भाजपाही मागेपुढे पाहत आहे”, असेही प्रशांत किशोर म्हणाले होते.