Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यु) चे प्रमुख नितीश कुमार हे कायमच घराणेशाहीवर टीका करत आले आहेत. बिहार हेच आपलं कुटुंब आहे असं त्यांनी कायमच म्हटलं आहे. राजद आणि लोजप यांच्याविरोधात नितीश कुमार यांनी कायमच टीका केली आहे. दरम्यान आता नितीश कुमार यांचा मुलगा निशांत राजकारणात येण्याची चिन्हं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी निशांत कुमार राजकारणात?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांच्या राजकीय वारसदाराचं म्हणजेच निशांत कुमार यांचं राजकारणात स्वागत होण्याची चिन्हं आहेत. कारण निशांत कुमार हे होळीनंतर राजकारणात येतील अशी शक्यता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्तवली आहे. नितीश कुमार यांनी हिरवा कंदिल दिला की निशांत कुमार राजकारणात येतील. निशांत कुमार यांनी त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे असं नितीश कुमार यांच्या जवळच्या सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. मागील वर्षभरापासून निशांत कुमार राजकारणात येणार अशी चर्चा आहे. निशांतने रितसर पक्षात प्रवेश करावा अशी मागणीही झाली होती. मात्र काही नेत्यांनी ती फेटाळली. आता नितीश कुमार यांनी हो म्हणताच निशांत कुमार राजकारणात येण्याची शक्यता आहे.

जाहीर कार्यक्रमात काय म्हणाले निशांत कुमार?

निशांत कुमार ८ जानेवारी रोजी वडील नितीश कुमार यांच्यासह बख्तियारपूर या त्यांच्या मूळ गावी एका पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषणही केलं. वडील नितीश कुमार आणि जदयू ला येत्या निवडणुकीत मतदान करा असंही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. इतके दिवस पडद्यामागे असलेले निशांत कुमार पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर कार्यक्रमात बोलताना दिसले. त्यानंतर आता पुन्हा एकदा निशांत कुमार राजकारणात येतील अशा चर्चा रंगल्या आहेत.

श्रवण कुमार यांनी काय म्हटलं आहे?

निशांत कुमार यांनी केलेल्या वक्तव्याचं आणि पक्षाला मतं द्या हे सांगणाऱ्या आवाहनाचं आम्ही स्वागत करतो. निशांत कुमार यांनी राजकारणात यायला हवं का? असं विचारलं असता श्रवण कुमार यांनी अर्थातच त्यांनी यायला हवं असं उत्तर दिलं आहे. निशांत कुमार पुरोगामी विचारांचे आहेत आम्ही त्यांचं स्वागतच करु, त्यांच्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं श्रवण कुमार यांनी म्हटलं आहे.

होळीनंतर राजकारणात सक्रीय होणार निशांत कुमार?

दरम्यान निशांत कुमार यांच्या राजकारणात येण्याबाबत जदयूने अधिकृतरित्या कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही होळीनंतर निशांत कुमार हे पक्षात येतील असं काही नेते खासगीत सांगत आहेत. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी २०१३ मध्ये त्यांचा मुलगा तेजस्वी प्रसाद यांना आपला वारस म्हणून पुढे केलं होतं. रामविलास पासवान यांनीही चिराग पासवान यांना पुढे आणलं त्याचप्रमाणे नितीश कुमारही लवकरच निर्णय घेतील अशी चर्चा आहे. आता नितीश कुमार नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar son nishant may joining politics jdu leaders say likely after holi he seems to be ready scj