लोकसभेची निवडणूक साधारण वर्षभरावर येऊन ठेपली आहे. असे असतानाच भाजपाच्या पराभवासाठी विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल (युनायटेड) पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार अग्रस्थानी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटसत्रांत सकारात्मक चर्चा झाली असून भाजपाच्या पराभवासाठी एकत्र येण्याची तयारी या सर्वच पक्षांनी दाखवल्याचे म्हटले जात आहे.
नितीश कुमार यांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट
नितीश कुमार आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली. अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. भाजपाच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, असे यावेळी नितीश कुमार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निराशा केली आहे. त्यांच्याकडून फक्त प्रसिद्धी मिळवण्याचे काम केले जात असून त्यांनी कोणतेही लोकोपयोगी काम केलेले नाही. भारताचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जाता आहे, असा आरोप नितीश कुमार यांनी केला.
हेही वाचा >> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अतिक अहमदचा मुद्दा; भाजपाची अखिलेश यादव यांच्यावर टीका, शेअर केला व्हिडीओ!
आगामी निवडणुकीत सर्वांनी मिळून काम करण्यावर एकमत
विरोधकांच्या नेतृत्वावरही नितीश कुमार यांनी भाष्य केले आहे. मला पंतप्रधान व्हायचे नाही, असे नितीश कुमार म्हणाले. “मला पंतप्रधान बनायचे नाही. मी फक्त विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. मी हे काम माझ्यासाठी नव्हे तर देशासाठी करत आहे,” असे नितीश कुमार म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील जुन्या संबंधांवरही भाष्य केले. “बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कायमच मैत्रिपूर्ण संबंध राहिलेले आहेत. आगामी निवडणुकीत सर्वांनी मिळून काम करण्यावर आमच्यात एकमत झाले आहे,” असे नितीश कुमार म्हणाले.
भाजपाला हटवून देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र- अखिलेश यादव
पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनीदेखील नितीश कुमार यांच्यासोबत झालेली बैठक आणि मोदी सरकारवर भाष्य केले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील शेतकरी, कामगार, गरीब लोक त्रस्त आहेत. भाजपाला हटवून देश वाचवण्यासाठी आम्ही लोक एकत्र आलो आहोत. या मोहिमेत आम्ही सर्वजण सोबत आहोत, असे अखिलेश यादव म्हणाले.
हेही वाचा >> ग्रामीण भागात पर्याय निर्माण करण्यावर चंद्रशेखर राव यांचा भर
नितीश कुमार यांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची भेट घेणार का? असे विचारले असता मी सध्यातरी अखिलेश यादव यांची भेट घेण्यासाठी आलो आहे, असे उत्तर नितीश कुमार यांनी दिले आहे. अखिलेश यादव यांची भेट घेण्याआधी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी वरील सर्वच नेत्यांनी एकत्र येण्यावर सकारात्मक चर्जा झाल्याचे सांगितले.
विरोधक एकत्र आहेत, हा संदेश गेला पाहिजे- ममता बॅनर्जी
आम्ही विरोधकांच्या युतीवर चर्चा करण्यासाठी एकत्र बसणार आहोत. पुढील नियोजनावर त्या बैठकीत चर्चा केली जाईल. लक्ष्य स्पष्ट असेल तर आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. १९७० च्या दशकात जेपी आंदोलनाची सुरुवात बिहारमधूनच झाली होती. त्यामुळे विरोधकांची पुढील बैठक ही बिहारमध्येच आयोजित केली जावी, अशी विनंती मी नितीश कुमार यांना केली आहे. विरोधक एकत्र आहेत, हा संदेश गेला पाहिजे. त्यानंतर आमच्यातील किमान समान कार्यक्रम आणि अन्य बाबींवर चर्चा करता येईल. आम्ही सर्वच विरोधी पक्षांच्या संपर्कात आहोत. आमच्यात कोणताही वाद नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासकामांचीही प्रशंसा केली.
हेही वाचा >> नगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विखे-पाटील आणि थोरात आमनेसामने
भाजपाकडून फक्त जुमलेबाजी-ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर थेट टीका केली. “भाजपाला सत्तेतून खाली खेचले पाहिजे, हे मी नेहमी म्हणते. माध्यमांच्या मदतीने ते सध्या हिरो बनले आहेत. त्यांच्याकडून खोटा आणि चुकीचा प्रचार केला जातो. ते फक्त जुमलेबाजी करतात. आम्ही देशातील इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. आमच्यात मानापमानाचा प्रश्न नाही. आम्ही सर्व विरोधक सध्या सोबत उभे आहोत, असा संदेश आम्हाला देशाला द्यायचा आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपाकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न – नितीश कुमार
ममता बॅनर्जी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीवर नितीश कुमार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही जे काही ठरवू ते देशाच्या हिताचेच असायला हवे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाला विकासाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला विकास झालेला आहे. हा विकास दिल्लीमध्ये बसलेल्या मोदी सरकारने केला आहे का? ही मेहनत पश्चिम बंगालमधील सरकारने घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी भाग घेतलेला नाही, ते आज देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. इतिहासात डोकावून पाहिल्यास हे सहज लक्षात येईल,” असे नितीश कुमार म्हणाले.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेनेच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम
भ्रष्ट लोकांची युती होत आहे- भाजपा
दुसरीकडे विरोधी गटात या घडामोडी घडत असताना भाजपाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षानेते तथा भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भ्रष्टाचारी लोक एकत्र येत आहेत, अशी टीका केली. या भ्रष्टाचारी युनायटेड फ्रंटच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तर निमंत्रक अरविंद केजरीवाल आहेत. ही अर्धवट युती आहे. विरोधकांमध्ये कोणत्याही विषयावर एकमत नाही, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला.
नितीश कुमार यांनी घेतली होती राहुल गांधींची भेट
दरम्यान, मागील महिन्यात ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आम्ही काँग्रेसशी युती करणार नाही, अशी भूमिकाही या दोन पक्षांनी घेतली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच या दोन्ही नेत्यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती.