मागच्या एका महिन्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या विरोधात एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात आहे. सोमवारी दोन्ही नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भेट घेतलेल्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील काँग्रेसच्या नेत्यांना देणे आणि येत्या काही दिवसांत पटणा येथे विरोधकांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सभेची तारीख ठरवणे या दोन मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी खरगे आणि गांधी यांची शेवटची १२ एप्रिल रोजी भेट घेतली होती. तेव्हा नितीश कुमार यांनी सहा पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची जबाबदारी घेतली होती. सहा नेत्यांचा काँग्रेससोबत फारसा संवाद नाही, तसेच सहापैकी दोन नेते काँग्रेसच्या आघाडीतही नाहीत.
मागच्या महिन्याभरात नितीश कुमार यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तसेच मुंबईत येऊन त्यांनी शिवसेनेचे (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. तसेच काही दिवसांपूर्वी ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि डी. राजा यांनाही भेटले.
हे वाचा >> विश्लेषण : नितीशबाबूंचा विरोधी ऐक्यासाठी पुढाकार; देशव्यापी एकास-एक लढतीचे प्रयत्न यशस्वी होतील?
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना भेटू शकले नाहीत. कुमार यांचा प्रयत्न आहे की, भाजपाविरोधात जास्तीत जास्त मतदारसंघांत विरोधकांचा एकच उमेदवार द्यायचा, जेणेकरून मतविभाजन रोखले जाईल आणि त्याचा विरोधकांना लाभ होईल. विरोधकांना एकत्र आणण्याची संकल्पना चांगली असली तरी त्यात अनेक अडथळेदेखील आहेत. कारण अनेक राज्यांत विरोधकांमध्येच अनेक पक्ष आहेत, जे एकमेकांविरोधात लढतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा ही त्याची मोठी उदाहरणे आहेत. प्रश्न असा आहे की, कोणता पक्ष पुढाकार घेणार?
तर काही विरोधी पक्षांची भूमिका डळमळीत आहे. तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला आघाडी न करता स्वबळावर सामोरे जाणार असल्याची घोषणा केली होती, मात्र कर्नाटकचा निकाल लागताच त्यांनी भूमिका बदलली. ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे, तिथे आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, बदल्यात त्यांनी आम्ही जिथे ताकदवान आहोत, तिथे पाठिंबा द्यायला हवा, अशी नवी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, काँग्रेसने कर्नाटकच्या विजयानंतर या वर्षअखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी माहिती गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. कर्नाटकच्या मोठ्या विजयानंतर काँग्रेस पक्ष मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणामधील निवडणुकांची तयारी करत आहे. २४ मे रोजी या राज्यांमधील स्थानिक नेतृत्व आणि निवडणूक प्रभारी यांची बैठक पक्षश्रेष्ठींकडून बोलाविण्यात आली आहे.