बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहेत. बिहार विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावरून त्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) जीतन राम मांझी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही उलटसुलट चर्चा झाली. विधानसभेत आरक्षणाचा कोटा वाढविण्याच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना जीतन मांझी यांनी जातनिहाय सर्वेक्षणाच्या वैधतेवर मधेच प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच संतापले आणि त्यांनी म्हटले की, २०१४ साली मी जीतन मांझी यांना मुख्यमंत्री केले होते, तो माझा मूर्खपणा होता.
बिहार विधानसभेत ओबीसी, ईबीसी, अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आली. त्यासाठी विधानसभेत विधेयक सादर करून, नंतर ते मंजूर करून घेण्यात आले. यावेळी जीतन मांझी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद उपस्थित झाला. जीतन मांझी हे पूर्वी नितीश कुमार यांच्या महगठबंधनमध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणीत एनडीएमध्ये प्रवेश केला. नितीश कुमार यांनी ज्यावेळी विधानसभेत जीतन मांझी यांच्यावर टीका केली, त्यावेळी मांझी यांनी संयम दाखवीत सभागृहात गोंधळ घातला नाही. सभात्याग करून ते बाहेर आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. यावेळी भाजपाचे अनेक आमदार त्यांच्यामागे उभे होते.
महादलित नेमके कोण?
नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा त्यांच्याच विरोधात वापर करण्याची रणनीती मांझी आणि भाजपाकडून आखली जात आहे. नितीन कुमार यांनी काही काळापासून जाणीवपूर्वक महादलित या गटाला ओळख प्राप्त करून दिली होती. पासवान समाजाला वगळून अनुसूचित जातींमधील सर्व जातींना महादलित म्हणून संबोधले गेले. मुशाहर आणि डोम या जातींचा यामध्ये समावेश होतो. या महादलित गटाच्या पाठिंब्यावर नितीश कुमार यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. आता त्यांनी केलेले वक्तव्य आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांच्याच विरोधात वापरण्याचे मनसुबे विरोधक आखत आहेत.
जीतन मांझी हे महदलित या गटातील मुशाहर जातीमधून येतात. नितीश कुमार यांनी एका मुशाहर मुख्यमंत्र्याचा अपमान केला आहे, असा प्रचार मांझी यांच्याकडून केला जात आहे. मुशाहर ही अनुसूचित जातींमधील सर्वांत मागास जात समजली जाते.
नितीश कुमार यांनी २०१४ मध्ये मला मुख्यमंत्री करून माझ्यावर उपकार केले होते का, असा प्रश्न मांझी यांनी १४ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. “नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असे दिसत आहे. त्यांनी माझा वापर करून महादलित गटाची मते मिळवली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे निर्णय मी स्वतः घेऊ लागलो. त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ झाले आणि त्यांनी माझ्याकडून मुख्यमंत्रिपद पुन्हा हिसकावून घेतले. हा केवळ माझाच नाही, तर संपूर्ण अनुसूचित जातींच्या समाजाचा अवमान होता. त्यांनी विधानसभेत माझ्याबद्दल जे काही शब्द वापरले, त्यावरून हे सिद्ध होते की, नितीश कुमार यांनी मला फक्त नामधारी मुख्यमंत्री केले होते.
१४ नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून, जीतन मांझी म्हणाले की, राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीत नितीश कुमार यांना स्थान दिले आहे; पण राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याशी संबंध ठेवताना सावध राहिले पाहिजे. नितीश कुमार त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अद्याप विसरलेले नाहीत.
नितीश कुमार यांना माध्यमाकडून अवाजवी प्रसिद्धी दिली जात असल्याचा आरोप करून हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन मांझी यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझा आवाज ऐकायचा की नाही, हे सर्व तुमच्यावर (माध्यमांवर) अवलंबून आहे. मी आता गप्प न बसता, थेट दिल्लीपर्यंत जाऊन लढा देणार आहे. प्रसंगी राजघाटावर जाऊनही आंदोलन करीन; पण दलितांचा अपमान होत असताना मी शांत बसणार नाही.”
जीतन मांझी यांची पार्श्वभूमी
मी नितीश कुमार यांच्यापेक्षा वयाने व अनुभवाने ज्येष्ठ (मांझी यांचे वय ७९ असून, ते नितीश कुमार यांच्यापेक्षा सात वर्षांनी मोठे) आहे, असेही मांझी सांगायला विसरले नाहीत. मी १९८० साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. माझ्यानंतर पाच वर्षांनी नितीश कुमार आमदार झाले. हिंदुस्तानी अवाम मोर्चाच्या एका नेत्याने सांगितले की, नितीश कुमार यांच्यामुळे आमच्या राजकीय वाटचालीचे एक प्रकारे पुनरुज्जीवनच झाले आहे. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत हा विषय उचलून धरू. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. जीतन मांझी यांचा अपमान करून, नितीश कुमार यांनी मोठी राजकीय चूक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तेलंगणा येथे निवडणुकीनिमित्त घेतलेल्या जाहीर सभेत म्हटले की, विरोधकांची इंडिया आघाडी दलितविरोधी आहे. त्यासाठी त्यांनी नितीश कुमार यांचा मांझी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला.
दुसरीकडे नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर जेडीयूकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती. या प्रकरणी शांत बसण्याची भूमिका पक्षाने घेतली होती. मात्र, जीतन मांझी यांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर आता जेडीयूने आपले दलित नेते मांझी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी समोर केले आहेत. इमारत बांधकाममंत्री अशोक कुमार चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभेत जे बोलले ते सत्य आहे. आपण एके दिवशी मुख्यमंत्री होऊ, असा मांझी यांनी स्वप्नातही विचार केला होता का? नितीश कुमार यांच्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो, असे स्वतः मांझी यांनीच अनेक वेळा सांगितले आहे.
जेडीयूचे आणखी एक दलित मंत्री व मुशाहर या समाजातून येणारे रत्नेश सदा यांनी म्हटले की, मुशाहर समाजासाठी मांझी यांनी काय केले, हे ते आम्हाला सांगू शकतात काय? मांझी यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळवून दिला. आपण मुशाहर समाजाचे नेते आहोत, या भ्रमात मांझी यांनी राहू नये.
बिहारमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १९.६५ टक्के एवढी आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ही संख्या विस्थापित झाल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात थोडीथोडकी तरी दलित मते आहेत. मागच्या अनेक निवडणुकांपासून दलितांमधील एक मोठा वर्ग नितीश कुमार यांना मतदान करीत आहे. ही मते स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने केला जातो. आता मांझी यांच्या जोडीने याबाबत यश मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष (लोजप)देखील एनडीएमधील घटक पक्ष आहे. लोजपदेखील या प्रयत्नांमध्ये भाजपाची साथ देऊ शकतो.
२०१४ साली लोकसभेत जेडीयू पक्षाचा पराभव झाल्यानंतर नितीश कुमार यांनी पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेऊन मुख्यमंत्रिपद सोडले होते. त्यांच्या जागी जीतन मांझी यांना मे २०१४ रोजी संधी देण्यात आली. फेब्रुवारी २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी विधानसभेच्या निवडणुकांआधी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. २०१५ साली नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करून निवडणुकीत विजय मिळविला.