मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात विस्तार करण्यात येणार असला तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला किती मंत्रीपदे वाटून दिली जाणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार यावर खल सुरू आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत यावर चर्चा होईल, असे शिंदे यांनी सांगितले.
मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप अंतिम झाल्यावरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. १६ तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार व्हावा, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा >>>“इंडिया आघाडी मी बनवलीय, संधी मिळाल्यास…”, ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; मित्रपक्षांच्या सावध प्रतिक्रिया
शिवसेनेला चांगली खाती आणि मंत्रीपदे हवी आहेत. मावळत्या मंत्रिमंडळातील सर्व खाती आपल्याकडे राहावीत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार बहुधा ११ किंवा १२ तारखेला होईल, असे सांगण्यात येत आहे.
अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल
विधानसभा अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक होणार असून, अर्ज दाखल करण्याची मुदत रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. भाजपमध्ये मंत्रीपदाची संधी न मिळणाऱ्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपविले जाऊ शकते, अशी चर्चा असली तरी मावळते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच अध्यक्षपदी फेरनिवड केली जाईल, असे सांगण्यात येते.