सातारा : राज्यात मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले. उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदे यांना मागितल्याचे आणि गृहमंत्रिपदाची, विधानसभेच्या अध्यक्षपदाची मागणी असल्याबाबतचे बोलणे शिंदे यांनी टाळले. ते रविवारी साताऱ्यातील दरे येथे पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्यामध्ये समन्वयाचा अभाव नाही. जनतेला अपेक्षित असलेले सरकार महायुती देईल. आमच्यामध्ये कोणताही किंतु परंतु नाही. आमची एकत्रित चर्चा झाल्यानंतर सर्व प्रश्न आपोआप सुटतील. त्यामुळे कोणीही या विषयावर वेगवेगळी चर्चा करायची गरज नाही. मला काय मिळाले आणि कोणाला काय मिळाले हा प्रश्नच महत्त्वाचा नाही तर आमच्याकडून लोकांना काय मिळणार हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावी पत्रकारांना सांगितले.

हेही वाचा >>> राज्यपालांकडे दावा करण्यापूर्वीच शपथविधीची तारीख परस्पर जाहीर; बावनकुळे यांच्या एकतर्फी घोषणेवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील सत्तास्थापनेची बैठक टाळून त्यांच्या मूळ दरेगावी आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश शिंदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी रविवारी त्यांच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले, त्यानंतर मुंबईला जाण्यापूर्वी पत्रकारांची संवाद साधला.

आपण विधानसभेचे अध्यक्षपद, उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदे यांना आणि गृहमंत्रिपद मागितल्याने सरकार बनवायला वेळ लागतो आहे का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. आता सरकार बनविण्याबाबत आमच्या तिघांची बैठक होईल आणि त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकार बनवण्यामध्ये माझा कोणताही अडथळा नाही असे मी पूर्वीच स्पष्ट केले आहे. राज्यातील निवडणुकीनंतर आमची सर्वांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे बैठक झाली आहे. राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील. तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जनतेने आम्हाला प्रचंड असे भरभरून यश दिले आहे. त्यामुळे जनतेला अपेक्षित असलेले निर्णय आमच्याकडून होतील. आम्ही लोकांना जे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सरकारकडून काम होईल असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No lack of coordination in mahayuti says cm eknath shinde print politics news zws