अलिबाग : विधानसभा निवडणूकीत भाजपला कोकणात सर्वाधिक यश रायगड जिल्ह्यात मिळाले. भाजपचे तीन आमदार निवडून आले. मात्र मंत्रीपदाच्या वाटपात रायगड जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी राहीली. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली. प्रशांत ठाकूरांचा मंत्रीपदासाठी यंदा विचार होईल अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र तसे झाले नाही.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भाजपचे फारसे अस्तित्व अत्यल्प होते. मात्र गेल्या काही वर्षात विवीध पक्षातील प्रस्तापित नेत्यांना पक्षात घेऊन, भाजपने आपल्या कक्षा रुंदावल्या. रायगड जिल्ह्यात प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, धैर्यशील पाटील, महेश मोहीते, सुरेश लाड, देवेंद्र साटम, बिपीन म्हामुणकर यासारखे नेत्यांना भाजपने सोबत जोडले. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. जिल्ह्यात सलग दुसऱ्यांना भाजपचे तीन आमदार निवडून आले.
हे ही वाचा… प्रफुल पटेल यांच्या गृहजिल्ह्याच्या नशिबी पुन्हा ‘पार्सल पालकमंत्री’
पनवेल मधून प्रशांत ठाकूर, उरण मधून महेश बालदी, तर पेण मधून रविशेठ पाटील तीन आमदार निवडून आले. धैर्यशील पाटील राज्यसभेचे खासदार झाले. तर विक्रांत पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपचे राजकीय प्रस्थ चांगलेच वाढले. अशावेळी एखादे मंत्रीपद मिळाले असते तर त्याचा फायदा पक्ष संघटनेला नक्कीच झाला असता. प्रशांत ठाकूर हे भाजप आल्यापासून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर यापूर्वी कॅबिनेट मंत्रीपदावर काम केलेले रविशेठ पाटील भाजपमधून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. नितीन गडकरींच्या मर्जीतले बालदी सलग दुसऱ्यांना निवडून आले आहेत. त्यामुळे तिघांपैकी एकाचा मंत्रीपदासाठी विचार होईल अशी अपेक्षा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना होती.
रायगड जिल्ह्यात भाजप प्रमाणेच शिवसेना शिंदे तीन आमदार निवडून आले. शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे या श्रीवर्धन मधून निवडून आल्या, पक्षाच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार असूनही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही सहयोगी पक्षाचे आमदार रायगड मधून मंत्री झाले. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील भाजप आमदारांचा पक्षनेतृत्वाने मंत्री पदासाठी विचार केला नाही.
हे ही वाचा…. वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर ताबा मिळविण्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे लक्ष्य
दुसरीकडे रविंद्र चव्हाण यांनाही मंत्रीपदात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे कोकणातील भाजप कार्यकर्त्यांसाठी हक्काचा माणूस आता मंत्रीमंडळात नसणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे यांना मंत्रमंडळात स्थान देण्यात आले असले तरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा फारसा संपर्क नाही त्यामुळे त्यांचा फायदा रायगड अथवा रत्नागिरीतील भाजप संघटनेला होईल अशी परिस्थिती नाही.