राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत महिलांना सामावून घेतले जाईल, अशा बातम्या माध्यमात पसरल्यानंतर आता संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महिलांना शाखेत सामावून घेण्याबाबतची कोणतीही चर्चा झाली नाही, अशी चर्चा फक्त माध्यमातच सुरू आहे. शाखा या पुरुषांच्या कार्यक्रमासाठी आहेत. स्वयंसेवक सकाळी ५.३० वाजता शाखेत येतात आणि त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता पुन्हा भेटतात. शाखेत विविध खेळ खेळले जातात, अभ्यास केले जातात. हे सर्व पुरुषांना नजरेसमोर ठेवून कार्यक्रम आखण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया होसाबळे यांनी हरियाणामधील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी माध्यमांशी बोलताना दिली.
माध्यमांशी बोलत असताना होसाबळे म्हणाले की, आगामी काळात महिलांसाठी संघ विविध कार्यक्रम राबविणार आहे. संघाच्या निर्णय प्रक्रियेतही महिलांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राष्ट्रीय सेविका समितीमध्ये महिलांसाठी कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच जिल्हास्तरावरदेखील महिला काम करत आहेत. पण संघटनेच्या इतर कामांत महिलांना सामावून घेण्यामध्ये काही अडचणी आहेत. जसे की, दूरवर प्रवास करणे. त्यामुळे महिलांसाठी वेगळे कार्यक्रम द्यावे लागणार आहेत.
सध्या संघातील महिला या महिलांशी निगडित कार्यक्रमात सहभागी होत आहेत. पुरुषांच्या तुलनेत त्यांना मोठ्या स्तरावर काम देण्यात आलेले नाही. संघाच्या कुटुंब प्रबोधन, सेवा विभाग, प्रचार विभाग असे कार्यक्रम महिलांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. यासाठीच विवाहित स्वयंसेवकांसाठी तीन महिन्यांतून एकदा कुटुंब शाखा गाव आणि शहर स्तरावर आयोजित केली जाईल, असा निर्णय हरियाणाच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही होसाबळे यांनी सांगितले.
मागच्या वर्षी विजयादशमीच्या भाषणात संघाने पहिल्यांदाच गिर्यारोहक संतोष यादव यांना निमंत्रित केले होते. विजयादशमीच्या कार्यक्रमात महिलांना पाहुणे म्हणून बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती. याच कार्यक्रमातील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संपूर्ण समाजात ५० टक्के महिलांची ताकद आहे, हे नाकारून चालणार नाही. आपण महिलांना मातेचा दर्जा दिला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना जगतजननी म्हटले जाते. मग असे असतानाही आपण त्यांचा कमी सहभाग कसा काय करून घेतला. त्यामुळे यापुढे महिलांचा सहभाग वाढविला जाईल.
एकतर आपण महिलांना प्रार्थना घरात डांबून ठेवले किंवा त्यांना दुय्यम दर्जा देऊन घरापर्यंतच मर्यादित ठेवले. यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना समान दर्जा देत सार्वजनिक पातळीवरील कार्यक्रमात सहभाग करून घेतला पाहिजे, असेही भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात सांगितले.