नागपूर : मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करतानाच शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता पद आहेच कुठे अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शनिवारी केला. तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी कामत यांचा आरोप फेटाळून लावतांना ठाकरे वेळच देत नव्हते असा प्रत्यारोप केला. नागपूर येथे सलग तिसऱ्या दिवशी आमदार अपात्रता प्रकरणावर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलाकडून तिसरे साक्षीदार खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी करण्यात आली. तब्बल चार तास झालेल्या या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी प्रश्नांचा भडीमार करीत खासदार शेवाळे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी युती करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपोटी शिंदे यांनी पक्ष आणि पक्षाचे कायकर्ते यांना पणाला लावले. तसेच एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेले मुख्यनेतेपदही बेकायदेशीर असल्याचा दावा कामत यांनी केला. त्यावर शेवाळे यांनी मात्र ठाकरे गटाच्या वकीलांचे दावे फेटाळून लावले. शिंदे गटाकडून १९९८ ची शिवसेनेची घटना आपल्या कागदपत्रांसोबत जोडण्यात आली असून आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आला. तर शिंदे गटाच्या वकिलांकडून २३ जून २०१८ रोजी झालेल्या शिवसेनेच्या प्रातिनिधिक सभेवरच बोट ठेवण्यात आले. विशेष म्हणजे याच सभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली होती. मात्र ही सभाच झाली नसल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांच्या विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना थंड प्रतिसाद

यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिंदेंच्या वकीलांकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तर आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता पदावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. १८ जुलै २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली. मुख्यनेता हे पद घटनेत आहे का, असा सवाल कामत यांनी केला. यावर आहे असे उत्तर शेवाळे यांनी दिले असता तुम्ही सादर केलेल्या घटनेत मुख्य नेता पद कुठे आहे ते दाखवा, अशी विचारणा वकीलांनी केली. त्यावर घटनेत दुरुस्ती करण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले. मात्र ही दुरुस्ती कधी करण्यात आली ते मात्र आपल्याला आठवत नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्यात ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार यावरून भाजपपुढे पेच

शेवाळे यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना, काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या सरकारबद्दल असंतोष असल्याने आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचीही मागणी केली होती. सर्व शिवसेना आमदार,नेते, उपनेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे सुद्धा राष्ट्रीय कार्यकारणीसाठी आग्रही होते. पण उद्धव ठाकरे हे यापैकी कोणालाच भेटत नव्हते . हे सर्व जण मविआमधील भ्रष्टाचारामुळे त्रस्त होते. परंतु ठाकरे यांनी कधीच भेटण्यासाठी वेळ दिली नाही, असा दावा शेवाळे यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No post of chief leader in shivsena constitution thackeray faction challenge to cm shinde s leadership print politics news css
Show comments