संतोष प्रधान
१४व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या साडेतीन वर्षांत विविध नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली. काँग्रेसला अद्याप तरी फुटीचे ग्रहण लागलेले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्ष एकसंघ असल्याचा दावा पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देण्यात आली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया झाल्या. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्या विरोधात अद्याप तरी ईडी किंवा अन्य यंत्रणांची कारवाई झालेली नाही. किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आस्लम शेख यांना मढ आयलंडमधील बेकायदा स्टुडियोवरून लक्ष्य केले होते. हा एकमेव अपवाद वगळात सोमय्या यांनी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात आरोपबाजी केली नव्हती.
हेही वाचा >>>राज्यातील विधानसभा व लोकसभेची एकत्र निवडणूक?
गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या भार जोडो यात्रा राज्यात प्रवेश करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी अशोक चव्हाण व त्यांचे समर्थक आमदार वेळेवर पोहचू शकले नव्हते. तेव्हा मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ लागला होता. पण अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली होती.
शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडण्यात भाजपला यश आले. या तुलनेत काँग्रेसमध्ये अजून तरी फूट पडलेली नाही. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेस नेते अधिक सावध झाले आहेत. येत्या आठवड्यात पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली आहे.