संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत १९९१ साली पहिले मोठे बंड झाले, तेव्हा हा पक्ष स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी पर्वात होता आणि आता अजित पवार यांच्या नेतृत्वात फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही रौप्यमहोत्सवी वर्षातच ‘बंडोबां’च्या खेळखंडोब्याला सामोरे जावे लागले आहे. विशेष हे की, या दोन्हीही बंडांमध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर ‘नायक व सह नायक’ अशी नोंद झाली.

शिवसेनेत १९९० नंतर नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनीही बंड पुकारले, पण बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व ऐनभरात असताना छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ३३ वर्षांपूर्वी झालेले मोठे बंड त्यावेळी काठावरच्या बहुमतात असलेल्या काँग्रेस पक्षाला बळ देणारे ठरले तर आता ‘राष्ट्रवादी’तल्या बंडामुळे बहुमताच्याही पुढे असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे बहुमत अधिक भक्कम झाले.

हेही वाचा >>>अजित पवारांना ७५ वर्षांचे छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर कसे चालतात ?

महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्या मोठ्या राजकीय बंडाची नोंद शरद पवार यांच्या नावावर १९७८ साली झाली होती. या बंडातून राज्यात सत्तांतर झाले होते. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जूनमध्ये केलेल्या उठावातूनही सत्तांतर तर झालेच, शिवाय या सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरूंग लावला.

गतवर्षीच्या सत्तांतरानंतर राज्यात महाविकास आघाडीची मोट भक्कम करण्याचा निर्धार वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त केला जात असताना, शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीप्रसंगी भाजपने ‘राष्ट्रवादी’त मोठी फूट पाडतानाच या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मोठा धक्का दिला. या बंडाच्या तीन आठवडे आधी या पक्षाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करून पक्षविस्ताराचे पाऊल टाकले होते. पण आता खुद्द शरद पवार यांना पक्ष सावरण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे.

हेही वाचा >>>उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षासोबत युती होणार का? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

शिवसेनेत १९९१ च्या अखेरीस भुजबळ यांचे मोठे बंड झाले तेव्हा या पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ ५२ होते. भुजबळ यांनी आपल्यासोबत २० ते २२ आमदारांना एकत्र आणले, पण संभाव्य बंडाची वाच्यता आधीच झाल्याने नंतर त्यातून काही गळाले, तरी त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांच्या समयसूचकतेमुळे बंडात शेवटपर्यंत राहिलेल्या आमदारांना कायदेशीर संरक्षण मिळाले होते. नंतर त्यावरून कोर्टकचेरी झाली नाही.

भुजबळ यांच्यावरील ‘बहुजनांचा नायक’ या पुस्तकात त्या बंडाचा काही तपशील आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे पहिले वृत्त १९९१ च्या डिसेंबरमध्ये आल्यानंतर भुजबळ यांनी तेव्हा तातडीने एक पत्रक काढले होते. त्यात त्यांनी शिवसेनेत दुफळी माजेल, अशा बातम्या प्रकाशित करू नका, असा सल्ला वृत्तपत्रांना दिला आणि नंतर दुसर्याच दिवशी त्यांनी १८ आमदारांसह पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

हेही वाचा >>>शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीत रायगड महत्वाच्या भूमिकेत

भुजबळ नंतर काँग्रेस पक्षात दाखल झाले. महसूल खात्याचे मंत्री झाले. १९९५ साली त्यांचा पराभव झाला, तरी काँग्रेसने त्यांना लगेचच विधान परिषदेत आणून विरोधी पक्षनेतेपद दिले. १९९९ साली ते पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. या नव्या पक्षाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. गेल्या रविवारी या पक्षात बंडाची तयारी चाललेली असताना, नेमके काय चालले आहे, हे तेथे पाहायला म्हणून गेलेले भुजबळ त्या बंडातले एक शिलेदार बनले, पण रौप्यमहोत्सवी वर्षातल्या दोन प्रभावशाली पक्षांच्या फुटीतील एका प्रयोगाचे ‘नायक’ तर दुसर्या प्रयोगात ‘सहनायक’ अशी नोंद एक नेता आणि नट अशी ओळख असलेल्या भुजबळांच्या नावावर झाली.

भुजबळ यांनी अलिकडे एका प्रकट मुलाखतीच्या शेवटी नटसम्राट नाटकातील ‘कुणी घर देता का, घर’ हे स्वगत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली होती. शरद पवार हे आपल्या मनात आणि विचारातही असल्याचे त्यांनी ठासून सांगितले होते, पण त्यानंतर साडेतीन महिन्यांनी अजितदादांना साथ देत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या विचारांचे घर उद्ध्वस्त केल्याचे बघायला मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now after shiv sena ncp also has cursed of split after 25 years print politics news amy
Show comments