दीपक महाले
जळगाव : बदलत्या राजकीय घडामोडींचा इतर जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यास फायदाच झाला आहे. ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादीचे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या पक्षांचे तीन मंत्री झाले आहेत..अनिल पाटील यांच्या समावेशामुळे मराठा समाजाला जिल्ह्यात ११ वर्षांनंतर मंत्रिपद मिळाले आहे. सध्या जिल्ह्यातील गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे दोनही मंत्री गुर्जर समाजाचे आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. शिंदे गटाकडून आमदार चिमणराव पाटील यांना ज्येष्ठत्वाच्या आधारे संधी मिळेल, अशी चर्चा असताना अचानक अजित पवार यांच्या बंडामुळे शिंदे गटाऐवजी राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाले. अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याचा अमळनेर येथे जल्लोष झाला असताना इतरत्र मात्र फारसा आनंद दिसून आलेला नाही.
हेही वाचा… धुळे जिल्ह्यात भाजपचाच फायदाच
आतापर्यंत जिल्ह्यात तीन वजनदार नेते होते. राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे, भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचीच नावे प्रामुख्याने चर्चेत असतात. खडसे हे लेवा पाटीदार समाजाचे, तर पालकमंत्री पाटील आणि मंत्री महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत. जिल्ह्यात मराठा समाजासह गुर्जर आणि लेवा पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे.
हेही वाचा… नव्या घडामोडींमुळे आमदार बच्चू कडू यांचे समर्थक अस्वस्थ
जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थांवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. खडसे-महाजन, खडसे-पाटील यांच्यात कायमच आरोप-प्रत्यारोप होत असतात. आता अनिल पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला चौथा चेहरा मिळाला आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेले पाडळसरे प्रकल्प, तसेच उपसा सिंचन योजनांना संजीवनी मिळण्याची आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… ठाण्यातील शिंदे गटाला आनंद परांजपे नकोसे
मराठा समाज हा बहुसंख्य असूनही जिल्ह्याच्या राजकारणात फार अल्पकाळ महत्त्वाच्या राजकीय पदांवर राहिलेला आहे. गेल्या २३ वर्षांत पारोळ्याचे डाॅ. सतीश पाटील, जळगावचे गुलाबराव देवकर या दोघांनाच राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. देवकर हे पहिल्याच प्रयत्नात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री झाले होते. पवार कुटुंबाच्या विश्वासातील नेते म्हणून ते परिचित आहेत. तत्कालीन पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात देवकर यांना अटक झाली. यामुळे सुमारे तीन वर्षे मंत्रिपदी राहिल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर त्यांचा राजकीय जीवनप्रवास झाकोळला गेला. देवकर यांना २०१२ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर ११ वर्षापर्यंत जिल्ह्यातील मराठा समाजातील कोणत्याही नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही.
हेही वाचा… आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ?
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात अनिल पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. अर्थात, आगामी काळच त्यांच्या आगामी राजकीय नेतृत्वाचे मूल्यमापन करणार आहे. जिल्ह्यातील मराठा समाजाला मंत्रिमंडळात मिळालेल्या प्रतिनिधित्वाने व्यापक सकारात्मक परिणाम होतील, असे राजकीय गोटात मानले जात आहे.
काळे झेंडे दाखविणारेच मंत्रिपदी
जळगावमध्ये २७ जून रोजी शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावेळी आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. त्यावेळी ज्यांना काळे झेंडे दाखविले, त्यांनाच मंत्रिपद मिळाले.