सध्या बिहारमध्ये राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्यातील युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि दिल्लीत खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी २०१३ मध्ये भाजपासोबतची पक्षाची युती संपुष्टात आणली होती. नोव्हेंबर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर काही लहान पक्षांशी हातमिळवणी केली होती. पुढे त्यांनी महागठबंधन तयार केले. मुरलेले राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या नितीश कुमार यांनी जुलै २०१७ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा उपास्थित करत महागठबंधनातून बाहेर पडले. त्यावेळी ते म्हणाले होते की, “त्यांच्याकडे भ्रष्टाचारासाठी शून्य सहिष्णुता आहे आणि आरजेडीकडे केंद्रीय ब्युरोच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कोणतीही उत्तरे नाहीत”.
नितीश कुमार हे जेव्हा महागठबंधनमधून बाहेर पडले तेव्हा सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, तेजस्वी आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना एका कंपनीला केलेल्या कथित सहकार्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन हॉटेल्सच्या देखभालीसाठी कंपनीला कथितपणे निविदा प्राप्त झाल्या होत्या. आयआरसीटीसी प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर सीबीआयने पाटणा आणि लालूंच्या निवासस्थानासह इतर १२ ठिकाणी छापे टाकले. सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवून पाठपुरावा केला होता. दोन केंद्रीय एजन्सींनी अनुक्रमे २०१७ आणि २०१९ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. हा खटला सध्या सुनावणीसाठी प्रलंबित आहे.
नितीश पुन्हा भाजपमध्ये गेल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तर त्यांच्या कुटुंबावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे. “प्रत्येकजण अंदाज लावू शकतो, आमच्या नेत्यांवरील खटले राजकीय सूडबुद्धीचा भाग आहेत. कोणत्याही परिस्थितीत, आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करतो, ”आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले.