संजीव कुळकर्णी
गेल्या महिनाभरातील राजकीय घडामोडींमुळे राज्यात शिवसेना-भाजपपासून ते मनसेपर्यंतचे राजकीय पक्ष माध्यमांमध्ये चर्चेमध्ये असताना, कधीकाळी देशावर सत्ता गाजवलेल्या जनता दलाचे मात्र राज्यात सध्या अस्तित्व शोधावे लागत आहे. महाराष्ट्र जनता दलाचा कारभार सध्या प्रभारी प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून सुरू आहे. अल्पमतात आलेल्या या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापासून माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांना दूर ठेवण्यात शरद पाटील गट यशस्वी ठरला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत चार मोठ्या पक्षांसह मनसे, शेकाप, एमआयएम, प्रहार इत्यादी राजकीय पक्षांचेही स्थान आहे; पण जनता दलाचा एकही आमदार सध्याच्या विधिमंडळात नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये आता या पक्षाचे संघटनही उभे नाही. मागील काळात देशाच्या सत्तेत राहिलेल्या तसेच देशाला नंतर चार पंतप्रधान देणाऱ्या या पक्षाचे राज्यातील एकमेव ठळक अस्तित्व म्हणजे, मुंबईत नरिमन पॉईंट भागात भाजप प्रदेश कार्यालयालगत असलेली प्रशस्त जागेतील कचेरी हे होय. या कचेरीतील अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे.
हेही वाचा– जनगणना करूनच ओबीसींच्या लोकसंख्येची निश्चितीची मागणी
माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा हे जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून महाराष्ट्रातील श्रीपतराव शिंदे हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मागील काही वर्षांपासून या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद माजी आमदार प्रा.शरद पाटील हे सांभाळत होते; प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी पुणे जिल्ह्यातील नाथा शेवाळे यांच्याकडे सोपविली असल्याची बाब अलीकडच्या एका पत्रामधून स्पष्ट झाली. पक्षातील या नव्या व्यवस्थेची माहिती समोर येण्याआधी मागील काही महिन्यांतील घडामोडीही बाहेर आल्या आहेत. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांना पदावरून दूर करण्याच्या मागणीसाठी पक्षाध्यक्ष एच.डी.देवगौडा यांना एक शिष्टमंडळ भेटले होते. त्यात नांदेडमधून माजी आमदार गंगाधर पटने, डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाचे म्हणणे देवगौडा यांनी ऐकून घेतले; पण प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत निर्णय घेतला नाही. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील हे आता जनता दलात दाखल झाले असून त्यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमले जावे, यासाठी पक्षातील एक गट आग्रही आहे.
दुसऱ्या बाजूला शरद पाटील यांनी आपली गच्छंती टाळली तसेच देवगौडा आणि श्रीपतराव शिंदे यांच्या माध्यमातून नाथा शेवाळे यांना प्रभारी अध्यक्ष केल्याचे सांगण्यात आले. राज्यात सध्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी चाललेल्या असताना अनेक जुने पक्ष कोणत्याही पातळीवर माध्यमांच्या केंद्रस्थानी नाहीत; पण जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील यांच्या १० जुलैच्या पत्रामुळे त्या पक्षातील एकंदर वर्तमान स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत गंगाधर पटने यांनीही प्रदेशाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.