चंद्रशेखर बोबडे

राष्ट्रवादी काँग्रेसशी युती राजकीयदृष्ट्या अडचणीची असल्याचे लक्षात आल्यावर सेनेच्या आमदारांनी बंड केले. आता याच मुद्यावरून सेनेच्या विदर्भातील खासदारांच्या मनातही चलबिचल वाढली आहे.लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या मतांची व मोदींच्या करिश्म्याची गरज  हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते.शिवसेनीतील आमदारांच्या बंडासाठी पक्षाने कॉंग्रस – राष्ट्रवादीशी केलेली युती हे प्रमुख कारण असल्याचे बंडखोर आमदारांचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतच सांगितले. त्यांनंतर हीच भूमिका बंडात सहभागी विदर्भातील पाच आमदारांनी त्याच्या मतदारसंघांत परतल्यावर मांडली. शिवसैनिकांनाही ती पटू लागली.त्यामुळेच बंडखोरांविरुध्द शिवसैनिकांचा रोष कमी होतांना दिसतोय.

दरम्यान आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही युतीच्याच मुद्यावरून अस्वस्थता वाढू लागली आहे. विदर्भात सेनेचे तीन खासदार आहैत.त्यात प्रतापराव जाधव ( बुलढाणा),भावना गवळी( यवतमाळ – वाशीम) आणि कृपाल तुमाने( रामटेक) यांचा समावेश आहे. हे तीनही लोकसभा मतदारसंघ सेनेचे बालेकिल्ले मानले जातात. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा सेनेचा गड होता.२०१९ च्या निवडणुकीत तो ढासळला. तीनही खासदार काँग्रेसचा – राष्ट्रवादीचा पराभव करून आणि भाजपशी युती असल्याने विजयी झाले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता या खासदारांना सेनेची भाजपसोबच युती असणे फायदेशीर वाटते. कारण २०१९ ची निवडणुकीत युती होती व त्याचा फायदा व मोदी करिश्म्याचा लाभ सेनेला झाला होता. त्यामुळे विदर्भातील खासदारांची अनुकूलता बंडखोर शिंदे गटाकडे वळण्याची शक्यता आहे.

भावना गवळी यांनी यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी युती करावी,अशी विनंती केली होती.अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. कृपाल तुमाने यांनी ते उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते..

Story img Loader