रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: जिल्ह्यात काँग्रेस पक्षात नियुक्ती होण्यापूर्वीच विरोधी गट तक्रारीसाठी तयार बसलेले असतात. निमित्त आहे, दोन महिन्यांपूर्वी ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले दिवाकर निकुरे यांनी पक्षांतर्गत लाथाळ्यांना कंटाळून राजीनामा दिल्याचे. खासदार बाळू धानोरकर व माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेदामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

चिमूरचे दिवाकर निकुरे यांची दोन महिन्यांपूर्वीच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती. निकुरे माजी मंत्री वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या निकुरे यांना वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीचा कानमंत्र दिला. त्यानुसार निकुरे यांनी तयारील सुरुवात केली. पैसे खर्च करण्याची तयारी असल्याने आपसूकच तळागाळातील कार्यकर्तेही निकुरे यांच्याशी हळूहळू जुळायला लागले. परिणामी चिमूर विधानसभा क्षेत्रातून पराभवांची मालिका अखंडित ठेवणारे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर अस्वस्थ झाले. येथूनच खऱ्या कुरबुरीला सुरुवात झाली. आ. वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातही पूर्वीसारखे सख्य राहिले नाही. त्यामुळे वारजूकर बंधूंनी एकीकडे निकुरे यांच्या विरोधात तक्रारींचा सपाटा लावला तर दुसरीकडे खासदार धानोरकर यांना हाताशी धरून निकुरे यांचे खच्चीकरण सुरू केले.

आणखी वाचा- अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग ; भाजप व ठाकरे गटात संघर्ष

काँग्रेसच्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून निकुरे यांचा संपूर्ण वेळ याला सांभाळ, त्याला सांभाळण्यातच गेला. यामुळे निकुरे प्रचंड अस्वस्थ होते. जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षातील अंतर्गत लाथाळ्या सुरू असल्याने आज राजीनामा देऊ की उद्या, अशी अवस्था त्यांची झाली होती. पक्षातील ओबीसी संघटनांची एकत्र मोट बांधणे तर दूरच नेत्यांची नाराजी थोपवण्यासाठीच त्यांना तारेवरची कसरत करावी सागली. अखेर मेटाकुटीस आलेल्या निकुरे यांनी मंगळवारी ओबीसी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळेच निकुरे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांनी निकुरे यांना ओबीसी प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी देऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. धानोरकर गटाच्या कार्यकर्त्यांची एखाद्या पदावर नियुक्ती झाली की वडेट्टीवार गटाचे कार्यकर्ते तक्रार करतात. वडेट्टीवार गटाच्या कार्यकर्त्याची नियुक्ती झाली तर धानोरकर गटाचे कार्यकर्ते तक्रार करतात. त्यामुळे काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांची घुटमळ होत आहे.

आणखी वाचा- आंध्र प्रदेशमध्ये विकासकामांच्या मुद्द्यावरुन ‘सेल्फी वॉर’, जगनमोहन रेड्डी-चंद्राबाबू नायडू आमनेसामने!

प्रशांत दानव यांची नियुक्ती

निकुरे यांनी ओबीसी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रशांत दानव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत दानव सलग चारवेळा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. कधीकाळी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी एकनिष्ठ असलेले दानव सध्या काँग्रेस शहराध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी यांच्या सोबतीने धानोरकर गटाशी जुळलेले आहेत. संघटनात्मक अनुभव नसलेल्या दानव यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. विशेष म्हणजे, दानव यांचे वास्तव्य चंद्रपूर शहरात आहे. शहरातील व्यक्तीची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. खा. धानोरकर यांचे समर्थक असल्यामुळे आता दानव यांच्याविरोधात वडेट्टीवार गट सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc district president resigns due to internal rifts in congress print politics news mrj
Show comments