लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर भाजपामधील मतभेद पुढे आले आहेत. या निवडणुका संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यावरून भाजपाच्या कार्यकारिणीत माजी आमदार सुधाकार भालेराव यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे निलंगेकर यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून याबाबत उपाय न झाल्यास पक्षांतर्गत दुफळीचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला बसू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील ८ वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिलेले नेते अशी संभाजी निलंगेकर यांची प्रतिमा आहे. लातूर भाजपा कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये भालेराव यांनी हा आक्षेप घेतल्याचे समजते. या विषयी भालेराव म्हणाले, ‘खरे तर अशी चर्चा झाल्याचे जाहीरपणे बोलणे योग्य होणार नाही. पण सक्षम नेतृत्व हवे असे आमचे म्हणणे आहे. निलंगेकर यांच्याऐवजी जिल्हाध्यक्ष रमेश कराडही सक्षम आहेत.’ लातूर महापालिका, भाजपाला यशही मिळाले होते. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मतभेद पुढे आले आहेत. या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना विचारले असता ते म्हणाले, अशा चर्चा होत असतात. याचा अर्थ तो काही ठराव असत नाही. 

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी संभाजी पाटील निलंगेकर होते. ते ठरवतील तेच उमेदवारही निवडले जात. विधानसभा निवडणुकांमध्येही संभाजी पाटील यांचा शब्दच अंतिम मानला जात असे. याच काळात औसा मतदारसंघात अभिमन्यू पवार यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यानुसार मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सत्ताकेंद्र काहीसे विभागले गेले. मात्र, या काळात निलंगेकर यांनी अन्याय केल्याची भावना भालेराव समर्थक कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसच्या साखर पेरणीच्या राजकारणाला छेद देत संभाजी पाटील यांनी स्वत:चा संपर्क वाढविलेला होता. आता मात्र त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतले जात आहेत. भाजपसाठी ही पक्षांतर्गत नाराजी डोकेदुखी तर काँग्रेससाठी एक राजकीय संधी ठरू शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objection in latur bjp on the leadership of sambhaji patil nilangekar pkd