ओडिशाचे माजी मुख्यमंत्री तथा नऊ वेळा खासदार राहिलेले गिरीधर गमांग यांनी पत्नी व मुलासह नऊ वर्षांनंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गमांग यांनी २०१५ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यांनी २०२३ मध्ये भाजपालाही सोडचिठ्ठी देत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश घेतला. मात्र, आता पुन्हा त्यांनी बीआरएस पक्षाचा राजीनामा देत नऊ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची ही घरवापसी काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा – अखिलेश यादव काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार नाहीत? नव्या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण!
कोण आहेत गिरीधर गमांग?
गिरीधर गमांग हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि १९७१ ते २००९ या काळात दक्षिण ओडिशातील कोरापूट लोकसभा मतदारसंघातून नऊ वेळा खासदार राहिले आहेत. गिरीधर गमांग हे आदिवासी समुदायातून येतात. त्यांनी २०२३ च्या सुरुवातीला भाजपातून बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नोव्हेंबर २०२३ मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या बीआरएसच्या पराभवानंतर त्यांनी आता पत्नी, मुलगा आणि माजी खासदार संजय भोई यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय मांकन आणि ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष अयोज कुमारही उपस्थित होते.
”मी पक्ष सोडला होता पण…”
यासंदर्भात बोलताना गिरीधर गमांग म्हणाले, ”नऊ वर्षांनंतर मी काँग्रेसमध्ये पुन्हा परतलोय, मी काँग्रेस पक्षात माझ्या राजकीय कारकिर्दीतील चार दशकं घालवली आहेत. पक्षाने मला पुन्हा प्रवेश दिला, त्यासाठी मी पक्षाचे आभार मानतो. नऊ वर्षांपूर्वी मी काँग्रेस पक्ष सोडला खरा, पण काँग्रेसच्या विचारधारेपासून कधीही दूर झालो नाही”. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लढणार का असे विचारले असता, काँग्रेस पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी पार पाडायचा मी प्रयत्न करेन असे ते म्हणाले.
वाजपेयींचे १३ महिन्यांचे सरकार पडण्याला ठरेल होते कारणीभूत
गिरीधर गमांग हे राष्ट्रीय स्तरावर तेव्हा चर्चेत आले, जेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील १३ महिन्यांचे एनडीए सरकार अविश्वास प्रस्तावादरम्यान एका मताने पडले. एनडीए सरकारच्या या पतनाला गिरीधर गमांग यांचे एक मत कारणीभूत ठरले होते. महत्त्वाचे म्हणजे अविश्वास प्रस्तावाच्या दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री झालेल्या गिरीधर गमांग यांनी लोकसभेत मतदान केले होते. कारण त्यांनी त्यापूर्वी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नव्हता. त्यांचे हे मत प्रचंड वादग्रस्त ठरले होते.
१० महिन्यांत सोडावे लागले मुख्यमंत्रिपद
गिरीधर गमांग यांचे मुख्यमंत्रिपदही जास्त काळ टिकले नाही. फेब्रुवारी ते डिसेंबर १९९९ दरम्यान ते ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले. अवघ्या १० महिन्यांच्या कार्यकाळात त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.
तीन पंतप्रधानांच्या सरकारमध्ये होते मंत्री
गिरीधर गमांग यांंनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बीजेडीच्या झिना हिकाका यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला होता.