Congress vs BJP Odisha Political News : २५ वर्षांपूर्वी भाजपानं ओडिशात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करून विरोधी पक्षानं सर्वसामान्यांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या रोषामुळे काँग्रेसला सत्तेतून बाहेर व्हावं लागलं. जवळपास अडीच दशकांचा कालावधी लोटला; मात्र तरीही काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही. ओडिशाच्या राजकारणातून दुर्लक्षित झालेला हा पक्ष आता भाजपा सरकारला कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्या जुन्या रणनीतीचा वापर करीत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांवरून काँग्रेस नेत्यांनी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसची रणनीती

गेल्या महिन्यात काँग्रेसनं पक्षाला पुन्हा रुळांवर आणण्यासाठी दलित चेहरा असलेले भक्त चरण दास प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली. पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान आहे. त्याशिवाय काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीही दिसून येत आहे. त्यामुळेच २००० पासून २०२४ पर्यंत भाजपाला ओडिशातील सलग सहा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, राज्यातील गमावलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेसनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भक्त चरण दास यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नवे प्रभारी अजय कुमार लल्लू यांच्याबरोबर मिळून भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली आहे.

आणखी वाचा : PM Modi on RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संघ मुख्यालयाशी इतकी वर्ष ‘का रे दुरावा’?

काँग्रेसच्या आमदारानं काय आरोप केला?

काँग्रेसच्या आमदार सोफिया फिरदौस यांनी आरोप केला की, भाजपा सत्तेत आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या एक हजार ६०० हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ५४ घटनांमध्ये पीडितांवर सामूहिक बलात्कार झाला आहे. “मलकानगिरीमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्र्यांच्या केओंझार जिल्ह्यातही दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. या दोन्ही घटना भाजपा सरकारचे अपयश दाखवून देतात”, असा आरोप सोफिया फिरदौस यांनी केला आहे.

ओडिशातून हजारो महिला बेपत्ता?

विधानसभेत दिलेल्या उत्तरांच्या आधारे काँग्रेसनं असा आरोप केलाय की, २०२० ते २०२४ दरम्यान ओडिशामध्ये ३६ हजार ४२० महिला आणि आठ हजार ४०४ मुलं बेपत्ता झाली आहेत. २०२४ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत आठ टक्के वाढ झाली आहे, असंही विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित केला आहे. कोरापुटचे खासदार सप्तगिरी उलाका यांनी १२ मार्च रोजी सभागृहात या घटनांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या १४ आमदारांचं निलंबन

विधानसभेतही या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमने-सामने आले होते. यावेळी काँग्रेसनं विधानसभेचं कामकाज रोखून धरलं आणि प्रथम मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्याकडून निवेदन मागितलं. नंतर सभागृह समितीकडून महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. काळे कपडे परिधान केलेल्या आमदारांनी सभागृहात घंटा वाजवून आणि झांज वाजवून सत्ताधाऱ्यांविरोधात निषेध नोंदवला. या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या १४ आमदारांना एका आठवड्यासाठी निलंबित केलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली. महिला आणि मुलांचं संरक्षण करण्यात राज्य सरकारच्या कथित अपयशाबद्दल त्यांनी विधानसभेला घेराव घालण्याची घोषणा केली. यादरम्यान विधानसभेकडे कूच करताना काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. दरम्यान, “पोलिसी बळाचा वापर करून, सरकार आमचं तोंड बंद करू शकत नाही. येत्या काळात आम्ही ही लढाई रस्त्यावर आणि प्रत्येक गावात घेऊन जाऊ,” असं भक्त चरण दास म्हणाले.

काँग्रसने सत्ता कशामुळं गमावली?

ओडिशात काँग्रेसचे सरकार असताना १९९९ मध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही घटना उजेडात आल्यानंतर विरोधात असलेल्या भाजपानं काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शनं केली. जनतेच्या मनात सरकारविरोधात रोष निर्माण झाल्यामुळे काँग्रेसला सत्तेतून बाहेर व्हावं लागलं. ही घटना पक्षाला आजही सतावत आहे. मात्र, राज्यात दरवर्षी असे हजारो गुन्हे उघडकीस येत आहेत. महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असून आम्ही तो नेहमीच उपस्थित करू, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं.

हेही वाचा : कुणाल कामराच्या प्रकरणानंतर उद्भवलेला प्रश्न… भारतीय राजकारणात विनोदाला स्थान आहे का?

काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं की, हायकमांडनं भक्त चरण दास यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा ऊर्जा भरली आहे. राज्य युनिटमधील सर्व गटांना बरोबर घेऊन ते काम करीत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. पक्षानं हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याला नागरिकांचंही समर्थन मिळत आहे. ओडिशात बिजू जनता दलाचे (बीजेडी) दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत टिकून राहणं हे महिला बचत गटांच्या पाठिंब्यावर अवलंबून होतं.

भाजपानं महिलांना काय आश्वासन दिलं?

बीजेडीला असलेला महिलांचा पाठिंबा तोडण्यासाठी भाजपानं राज्यात सुभद्रा योजनेचा प्रचार केला. एका काँग्रेस नेत्यानं सांगितलं, “२०२४ च्या निवडणुकीपर्यंत राज्यातील अनेक महिलाकेंद्रित कार्यक्रमांमुळे आणि मिशन शक्ती उपक्रमामुळे बीजेडीबरोबर होत्या. मात्र, भाजपानं सुभद्रा योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरवर्षी ५०,००० रुपये देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी निवडणुकीत महिला मतदार भाजपाच्या बाजूनं झुकल्या. एकीकडे ही योजना राबविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. राज्यात महिलाच सुरक्षित नसतील, तर योजनांचा काय उपयोग, असा प्रश्नही काँग्रेस नेत्यानं केला.

काँग्रेसच्या आरोपांना भाजपाचं उत्तर

दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना ओडिशाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल म्हणाले की, जनतेनं त्यांना का नाकारलं याचं काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. उगाच खोटे आरोप करू नयेत. ओडिशात ४० वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचा टक्का १६.१२% पर्यंत घसरल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणखी घसरून १३.२६ इतकी झाली आहे. सध्या काँग्रेस हा ओडिशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, त्यांच्याकडे १४ आमदारांचं संख्याबळ आहे.