ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या विरोधात परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. निवेदिता चौधरी यांनी हे आरोप नाकारले आहेत, पण या निमित्ताने भाजपामधील गटबाजी देखील उघड झाली आहे. परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष चेतन पुरोहित यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या सोमवारी परतवाडा येथील एका हॉटेलमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आपण आणि आपले सहकारी हॉटेलमध्ये निवेदिता चौधरी यांच्यासोबत चर्चा करीत असताना शिवराय कुळकर्णी हे समोरून बैठकीच्या ठिकाणी सभागृहात निघून गेले. ते गेल्यानंतर लगेचच चौधरी यांनी आपल्याला उद्देशून अत्यंत गलिच्छ भाषेत ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यात ब्राम्हण जातीविषयी द्वेष, घृणा आणि अपमानास्पद शब्द होते. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या. तक्रारीत साक्षीदार म्हणून भाजपाचे शहर उपाध्यक्ष, भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे देखील जोडण्यात आली आहेत. या तक्रारीच्या आधारे निवेदिता चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्यात कुठलाही विसंवाद नाही

भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि आपल्यात कुठलाही विसंवाद नाही. मात्र, आपल्या पश्चात बैठकस्थळी काय घडले याची कल्पना आपल्याला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, निवेदिता चौधरी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा पक्ष स्थापनेपासून सक्रिय सदस्य आहे. या पक्षासाठी ब्राम्हण समाजाचे महत्वपूर्ण योगदान असल्याची जाणीव आहे. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर माझ्या कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण दोन पदावर ब्राम्हण समाजाचे पदाधिकारी प्रतिनिधित्व करत होते. काही दिवसांपूर्वी एका पदाधिकाऱ्याला पदमुक्त केल्याने जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. परतवाडा येथे उपस्थित असताना मी ब्राम्हण समाजविरोधी कुठलेच वक्तव्य केले नाही. काही विकृत मनोवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांनी खोटा डाव रचत मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला असून माझी खोटी तक्रार दिली आहे, असे निवेदिता चौधरी यांचे म्हणणे आहे. त्यांच्या समर्थनार्थ भाजपामधील एक गट समोर आला आहे. तर दुसऱ्या गटाने हे प्रकरण तापविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले

निवेदिता चौधरी यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. अनेकांनी चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे भाजपामध्ये बहुजन विरूद्ध ब्राम्हण असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. हे प्रकरण सामोचारातून सोडवले जावे, असे प्रयत्न देखील आता सुरू झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offence register against bjp amravati district president nivedita chaudhari pkd