अमरावती : जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्‍ये बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षांनी जुन्‍या-जाणत्‍या नेत्‍यांना उमेदवारी दिली असली, तरी काही जागांवर नव्‍या चेहऱ्यांना संधी दिली आहे. स्‍पर्धक तेच, डावपेचही तेच, पण पक्ष नवे अशी स्थिती काही ठिकाणी आहे. जुन्या नव्यांच्या संघर्षात कुणाचा टिकाव लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणाऱ्या सुलभा खोडके या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे निवडणूक रिंगणात आहेत. तर गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेस तर्फे भवितव्य आजमावत आहेत. भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी करत वेगळा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मनसेने मात्र यावेळी पप्पू उर्फ मंगेश पाटील या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मेळघाट मध्ये नेते जुने पण पक्ष नवे, अशी स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवणारे राजकुमार पटेल यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला पण जागा न मिळाल्याने त्यांना स्वगृही परतावे लागले. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणारे केवलराम काळे यावेळी भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने मात्र डॉ. हेमंत चिमोटे या नव्या चेहऱ्यावर डाव खेळला आहे.

आणखी वाचा-भंडारा जिल्ह्यात बंडखोरांची मनधरणी

अचलपूरमध्‍ये भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे हे प्रथमच विधानसभेच्‍या रिंगणात आहेत. प्रहारचे बच्‍चू कडू आणि काँग्रेसचे बबलू देशमुख गेल्‍या निवडणुकीतही समोरा-समोर होते. बडनेरात गेल्‍या वेळी युवा स्‍वाभिमानचे रवी राणा आणि शिवसेनेच्‍या प्रीती बंड यांच्‍यात सामना झाला होता, यावेळी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) सुनील खराटे या नव्‍या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्‍यांच्‍या विरोधात प्रीती बंड यांनी बंड केले आहे, तर रवी राणांसमोर भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांचे आव्‍हान आहे.

दर्यापूरमध्‍ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातर्फे अभिजीत अडसूळ हे पुन्‍हा एकदा भवितव्‍य आजमावण्‍यासाठी रिंगणात आले असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे गजानन लवटे या नव्‍या चेहऱ्याला संधी मिळाली आहे. गेल्‍या निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले हे युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत.मोर्शीत काँग्रेसने गिरीश कराळे हा नवा चेहरा दिलेला असताना आमदार देवेंद्र भुयार यांनी पक्ष बदलत राष्‍ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) घड्याळ बांधली आहे. त्‍यांच्‍या विरोधात भाजपनेही उमेश यावलकर या नव्‍या चेहऱ्याला समोर केले आहे.

आणखी वाचा-आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले

तिवसामध्‍ये काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांच्‍या विरोधात पुन्‍हा एकदा राजेश वानखडे हे प्रतिस्‍पर्धी उमेदवार आहेत. पण, राजेश वानखडे यांनी पक्ष बदलून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. धामणगाव रेल्‍वेत वरिष्‍ठ नेते काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप, भाजपचे प्रताप अडसड आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्‍वकर्मा यांच्‍यात पुन्‍हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old and new faces clash in amravati assembly constituencies in maharashtra assembly election 2024 print politics news mrj