राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आसाममध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे काही कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या यात्रेत भाजपाचे झेंडे घेऊन दाखल झाले होते. तसेच राहुल गांधी यांना श्रीमंत शंकरदेव यांच्या बाट्राद्राव थान येथे जाण्यासही परवानगी नाकारली आली. याबरोबरच मंगळवारी त्यांना गुवाहाटी पोलिसांबरोबर संघर्षही करावा लागला. दरम्यान, यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मात्र, या दोघांमधील हा वाद काही नवा नाही, यापूर्वी अनेकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी राहुल गांधी यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई यांचे काँग्रेस पक्षातील वाढते महत्त्व लक्षात येताच त्यांनी २०१५ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी त्यांनी अनेकदा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सरमा आणि राहुल गांधी यांच्यातील वादाचा उल्लेख केला होता. तसेच सरमा यांना मुख्यमंत्री करण्यास राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला, असे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा – राम मंदिरामुळे देशातील राजकारण बदलणार? विरोधकांपुढे आव्हान काय?
या आत्मचरित्रात ते म्हणतात, ”मला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आसामचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. तसेच त्यांनी मला आसाममध्ये जाऊन पक्षनेता निवडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मी सरमा आणि त्यांच्या समर्थक आमदारांना माझ्या दिल्लीतील निवासस्थानी येण्यास सांगितले. त्यावेळी सरमा हे ४५ आमदारांसह माझ्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्या काही दिवसानंतरच मी गौरव गोगोई यांना त्यांच्या समर्थक आमदारांसह माझ्या निवासस्थानी येण्यास सांगतिले. त्यावेळी गोगोई यांच्याबरोबर केवळ सात आमदार होते.”
”ही संपूर्ण परिस्थिती मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितली. मी त्यांना सांगितले की, सरमा यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी आसाममध्ये जाण्यास सांगितले. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी मला राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांनी मला आसाम दौरा रद्द करण्यास सांगितले. तसेच मला त्यांच्या निवासस्थानी बोलावले.”
”दुसऱ्या दिवशी मी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचलो, तरुण गोगोई आणि त्यांचे पुत्र गौरवदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी आसाममधील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, असे राहुल गांधींनी मला स्पष्टपणे सांगितले. मी त्यांना सरमा यांच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून ते पक्षात बंडखोरी करू शकतात, याची कल्पना दिली. मात्र, त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या असे त्यांनी सांगितले. मी हा संपूर्ण प्रकार सोनिया गांधी यांना सांगितला. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून यावर ठाम भूमिका घेतली नाही. याउलट सरमा बंडखोरी करणार नाही यासाठी प्रयत्न करा, असे मला सांगितले.”
दरम्यान, सरसा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या श्वानाचा एक व्हिडीओ ट्विट करत सरमा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरही सरमा यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले होते. ”या श्वानाला माझ्यापेक्षा चांगलं कोणीही ओळखू शकत नाही, मला आजही आठवतं, आम्ही तुमच्याकडे आसाममधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायला आलो होतो, तेव्हा तुम्ही तुमच्या श्वानाला बिस्कीट खाऊ घालण्यात मग्न होता.
२०२१ मध्ये सरमा ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘अड्डा’ या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळीही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, ”ज्यावेळी मी मंत्री म्हणून राजीनामा दिला, त्यावेळी सोनिया गांधी यांनी मला राहुल गांधी यांची भेट घेण्यास सांगितले. मी त्यांना भेटायला गेलो. आमची भेट अतिशय वाईट होती. मी आजपर्यंत याविषयी कधीही सार्वजनिकरित्या बोललो नाही. त्या भेटीदरम्यान, मी त्यांना एखादा विषय सांगायचो, तेव्हा ते मला ‘मग काय?’ असं उत्तर द्यायचे. आमची बैठक जवळपास २० मिनिटं चालली. या २० मिनिटांत राहुल गांधी यांनी जवळपास ५० वेळा ‘मग काय’ या शब्दाचा वापर केला.
ते पुढे म्हणाले, ”एक दिवस मी, सीपी जोशी, अंजना दत्ता आणि तरुण गोगोई आम्ही चौघे जण राहुल गांधी यांना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की, आसाममध्ये प्रचंड क्षमता आहे, आपण भाजपाला पराभूत करू शकतो. मात्र, राहुल गांधी यांना या बैठकीत कोणताही रस नव्हता, ते त्यांच्या श्वानाशी खेळण्यात मग्न होते. काही वेळाने आमच्या पुढे टेबलावर चहा आणि बिस्किटे ठेवण्यात आली, त्यावेळी राहुल गांधींच्या श्वानाने त्या प्लेटमधील बिस्किटे घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी माझ्याकडे बघून हसू लागले. मी विचार करत होतो की, राहुल गांधी कोणालातरी प्लेट बदलायला सांगतील. त्यामुळे मी काही वेळ चहाचा कप हातात घेऊन वाट बघत होतो, मात्र त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. त्यानंतर माझ्याबरोबर आलेल्या नेत्यांनी त्याच प्लेटमधून बिस्कीट घेऊन खाल्ली. त्याचवेळी मी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला.