जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असून अनेक ठिकाणी प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात येत आहे. दरम्यान, यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारने बुलडोझर हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा, असं ते म्हणाले. श्रीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – Tripura poll : “त्यांना राम आणि कृष्णाच्या अस्तित्वावर शंका”, कांग्रेस आणि डाव्यांवर बरसले योगी आदित्यनाथ
काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
“जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र अराजकता पसरली आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेअंतर्गत अनेकांची घरं आणि दुकानं पाडण्यात येत आहेत. ही मोहीत कोणत्या आधारावर सुरू आहे, याची कोणालाही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया उमर अब्दुल्ला यांनी दिली. तसेच “नॅशनल कॉन्फरन्स अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने नसून आमचा विरोध हा असंविधानिक पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईला आहे”, असंही ते म्हणाले. याचबरोबर अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने योग्य प्रक्रियेचा अवलंब करावा आणि बुलडोझर हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा – “लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त ४०० दिवस..” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र
“…त्यानंतर बुलडोझरद्वारे कारवाई करावी”
“प्रशासनाने राज्य सरकारची जमीन बळकावणाऱ्यांची यादी तयार करावी आणि लोकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. तसेच महसूल पथकाला त्याची पडताळणी करण्याची परवानगी द्यावी. योग्य पडताळणीनंतर कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातील जमीन बेकायदेशीरपणे आढल्यास त्याला ती जागा खाली करण्याचे निर्देश द्यावे, त्यानंतर संबंधित व्यक्तीने ती जागा खाली न केल्यास त्यावर बुलडोझरद्वारे कारवाई करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.
“…तर आम्ही न्यालायलातही जाऊ”
पुढे बोलताना, ही कारवाई टाळण्यासाठी अनेकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच ही कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर हा मुद्दा आम्ही संसदेत मांडणार असून सरकारने ही कारवाई थांबवली नाही, तर आम्ही न्यालायलातही जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.