शेतकर्यांना शेतीमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणा सरकारने ‘रायथू बंधू’ या योजनेची घोषणा केली होती. टीआरएस सरकारच्या या द्वि-वार्षिक योजनेवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. रायथू बंधू योजने अंतर्गत खरीप हंगामासाठी देण्यात येणारे अनुदान देण्यास विलंब झाला आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही पक्षाने या मुद्यावर राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत शेतकर्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. अनुदानाची ही रक्कम जून महिन्याच्या सुरुवातीला द्यायची होती. मात्र ही रक्कम अजूनही दिली गेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बांदी संजय कुमार यांनी सोमवारपासून शेतकर्यांना त्यांच्या विविध जिल्हा मुख्यालयात भाजपासोबत आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे, तर राज्य काँग्रेस कमिटीने शेतकर्यांना तात्काळ रक्कम न मिळाल्यास २८ जून रोजी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. यांनी पुढे सांगितले की “राज्य सरकारने पैसे जमा करण्याची प्रक्रिया २२ जून रोजी सुरू केली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ने मात्र काही पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यास सुरूवात झाली असल्याचे म्हटले आहे. विरोधकांच्या हातात काही ठोस पुरावे नसताना ते फक्त सरकारवरच्या अडचणी वाढवण्यासाठी आरोप करत असल्याचा दावा केला आहे. कृषी मंत्री एस निरंजन रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, “रायथू बंधू अनुदान योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर ५,००० रुपये अनुदान देण्यात येते. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल जाईल.प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही”
गेल्या हंगामातील धानाची विक्री न झाल्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात येणार होते. मात्र टीआरएस सरकारने मुद्दामून अनुदानाची रक्कम रोखल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.तेलंगणातील भात खरेदी प्रक्रियेवर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यापूर्वीच टीआरएस सरकारवर ताशेरे ओढले आहे. राज्यात बंपर पीक आल्यामुळे आणि केंद्राने संपूर्ण पीक खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकरी अडचणीत आले होते. शेतकाऱ्यांच्या दुरवस्थेला केंद्राच्या अयोग्य आणि गैर-एकसमान खरेदी प्रक्रिया जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधारी केसीआर सरकारने केला आहे.
तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने देखील शेतकर्यांना संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहेत. काँग्रेस नेते मोहम्मद अली शब्बीर म्हणाले की, काँग्रेस टीआरएस नेत्यांना घेराव घालणार आहे आणि २८ जूनपर्यंत अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही तर मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेत निदर्शने करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.