छत्रपती संभाजीनगर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नांदेड लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न कॉग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी हाणून पाडला. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीसाठी मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ऐन निवडणुकीमध्ये कॉग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा चव्हाण यांचा निर्णय नांदेडच्या मतदारांना पटलेला नव्हता असे प्रचारात दिसून येत होते. निकालातून ते स्पष्ट झाले.

हेही वाचा… मायावतींच्या बसपाला उतरती कळा; मतदारांनी का नाकारलं?

नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंत चव्हाण यांचा संपर्क तसा फक्त नायगाव मतदारसंघापुरता होता. अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेमुळे कॉग्रेस कार्यकर्ते चिडले होते. मराठा मतांचा रोष अधिक असल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी अशोक चव्हाणांसमोर घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यांची गाडीही अडविली गेली. त्यांच्या पत्नी व मुलींनाही आरक्षण समर्थक कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मराठाबहुल गावात प्रचार करायला जायचेही अशोक चव्हाण यांनी टाळले होते. निवडणूक जरी प्रताप पाटील चिखलीकर लढवत असले तरी प्रतिष्ठा अशोक चव्हाण यांनी पणाला लागली होती. चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर असल्याने आता अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. ते राज्यसभेत खासदार असतील पण मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे भाजप सोपविण्याची शक्यता आता धुसर होताना दिसत आहे.

हेही वाचा… सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

नांदेड जिल्ह्यात ११ लाख २८ हजार मतदान झाले हाेते. २३ उमेदवारात मतविभाजन घडवून आणण्यात भाजपला यश मिळाले नाही. मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचे एकत्रिकरण झाल्यामुळे ज्या मतांवर अशोक चव्हाण निवडून यायचे ती सर्व मते वसंत चव्हाण यांच्या पारड्यात पडल्याचे दिसून येत आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे या निवडणुकीत मागच्या बाकावर दिसून येत होते. त्यास चव्हाण यांचे भाजपमध्ये येण्याच्या कारणाचीही भर पडली.