नाशिक : पक्ष स्थापनेनंतर २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ साली मात्र रिंगणातून माघार घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत मनसे आपला पहिला खासदार लोकसभेत पाठवण्यासाठी लढणार की नाही, याविषयी रहस्य अजून कायम असले तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात पक्ष नव्याने संधी धुंडाळत आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आपले पत्ते उघड न करता कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रणनीती ठेवत मनसे भाजपशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे अधोरेखीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्याने बदललेल्या समीकरणाचा शक्य तितका राजकीय लाभ उठवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यात लोकसभा निवडणूक समाविष्ट असेल की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. मनसेने पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार यंदा नाशिकची निवड झाली. त्यामागे शिवसेना ठाकरे गटाला शह देण्याचे नियोजन होते. राज यांच्या नाशिक दौऱ्याचे नियोजन ठाकरे गटाचेच अनुकरण करणारे ठरले. अयोध्येतील राम मंदिरातील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी श्रीराम भूमीतून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचे जाहीर केल्यानंतर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा अनेक नेत्यांपाठोपाठ आता राज ठाकरे यांचाही समावेश झाला. ठाकरे गटाने श्रीराम भूमीत राज्यव्यापी महाशिबीर, जाहीर सभेतून लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फोडले. त्याच धर्तीवर, मनसेने वर्धापन दिनी शक्ती प्रदर्शन केले, पण निवडणुकीत महायुतीत सामील होणार की हा माझा मार्ग एकलाची भूमिका घेणार, हे जाहीर न करता तूर्तास संयमाचा मार्ग निवडणे पसंत केले. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याची आग्रही भूमिका घेणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

हेही वाचा… सर्वपक्षीय नेतेमंडळींचा घराणेशाहीवर भर! उमेदवारी नातेवाईकांना मिळण्यासाठी आटापिटा

मेळाव्यात मनसेच्या प्रमुख नेत्यांचा रोख शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावरच प्रामुख्याने राहिला. भाजप तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका न करता पक्षाने नवीन समीकरणे जुळविण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसले. १८ वर्षांच्या प्रवासात मनसेने बरेच चढ-उतार, यश-अपयश पाहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली, तेव्हा राज यांना नाशिकमधून मोठी रसद मिळाली होती. तसाच प्रतिसाद आजतागायत मिळाल्याने बाळा नांदगावकर यांनी व्यासपीठावरून साष्टांग दंडवत घातला. या प्रवासात मनसैनिकांना खूप काही सहन करावे लागले. अनेक आंदोलने केली. गुन्हे दाखल झाले. पोलिसांचा मार खावा लागला. अजूनही न्यायालयात चकरा माराव्या लागतात. यावर बोट ठेवत येणारा काळ पक्षासाठी सुवर्णकाळ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाभारतातील कौरव-पांडव युध्दाचे दाखले देत पांडवांकडील कृष्णासारखा आपल्याकडे हुकमी एक्का असल्याचे सांगितले गेले. मनसेची संपलेला पक्ष म्हणून हेटाळणी करणाऱ्यांची अवस्था मांडण्यात आली. शिवसेनेत अपमान झाल्याने राज यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी मनसे हा नवीन पक्ष काढल्याकडे नांदगावकरांनी लक्ष वेधले. उद्धव आणि राज ठाकरे या दोघांबरोबर आपण काम केल्याचे सांगत त्यांनी उभयतांमधील फरक कथन करणे मात्र टाळले. आगामी निवडणुकीत चमत्कार घडविण्यासाठी गटबाजी संपवण्याचे आवाहन नेत्यांना करावे लागले. समाज माध्यमांच्या प्रभावी वापरासाठी मनसेकडून आता अभ्यास वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. देशात एकहाती सत्ता मिळवणाऱ्या जनसंघ ते भाजपच्या वाटचालीची यशोगाथा कार्यकर्त्यांसमोर मांडत राज ठाकरे यांनी यश मिळण्यासाठी संयम आवश्यक असल्याचा संदेश दिला.

हेही वाचा… अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?

वर्धापन दिन मेळाव्यातून प्रामुख्याने पक्षाची पुढील दिशा ठरवली जाते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा होऊनही भविष्यातील कोणतीच राजकीय भूमिका मांडण्यात न आल्याने मोठ्या अपेक्षेने आलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे संयम ठेवणे भाग आहे.