लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना ही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने रक्षाबंधनाचे मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटात प्रचारासाठी चढाओढ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून फलकबाजी व अन्य माध्यमांमधूनही योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक असून भाजपचे मुरजी पटेल हेही निवडणुकीची तयारी करीत आहेत. शर्मा यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत तर पटेल यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांना भाजप महिला मोर्चाच्या पुढाकाराने २५ लाख राख्या पाठविण्यात येत आहेत. भाजप व शिंदे गटातील आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम, माहिती पुस्तिका आणि फलक लावण्यात येत आहेत. अनेक भागांमध्ये घरोघरी राख्याही पाठविण्यात येत आहेत. या योजनेचा जोरदार प्रचार करून निवडणुकीत राजकीय लाभ उठविण्यासाठी भाजप-शिंदे गट प्रयत्नशील आहे.
हेही वाचा >>>Champai Soren : झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का? माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर?
योजनेची मुदत काढून टाकण्याची मागणी
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठीचे अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने योजनेसाठीची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. योजनेसाठी सुरुवातीला १५ जुलैची मुदत होती. मुदत वाढविण्याची मागणी आम्ही केल्यावर ही मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली. महिलांसाठी सामाजिक सुरक्षा हक्क देणारी ही योजना असल्याने अर्ज करण्याची मुदत काढून टाकावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.