मोहनीराज लहाडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (दि. ३१) होणाऱ्या अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नातू व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल चढवणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत.
शरद पवार तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे ८ सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच जयंती सोहळ्यास चौंडीत येत आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजात तीव्र असंतोष आहे. त्याची झळ राष्ट्रवादीला बसली आहे. त्यानंतर आता त्यांनी धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचे पाऊल उचलल्याचे मानले जाते. भाजपचे आमदार पडळकर यांनी समाजमाध्यमांवर ध्वनिचित्रफीत प्रसारित करून जयंतीनिमित्त ‘जागर अहिल्यादेवी युगाचा, जागर पराक्रमी इतिहासाचा’ असे आवाहन करत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव (रविवार, दि. २९) ते अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडी (मंगळवार, दि. ३१) अशी ही यात्रा आयोजित केली आहे. तिचा समारोप मंगळवारीच चौंडीत होत आहे. या निमित्ताने आमदार पडळकर यांनी धनगर समाजाने त्यांच्या इतिहासावर व प्रेरणास्थानावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना जाब विचारण्याचे तसेच आपले हक्क व अधिकार घेण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. पवार व पडळकर एकाच दिवशी चौंडीत दाखल होत आहेत. कार्यक्रमासाठी आमदार पडळकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.
अहिल्यादेवींच्या जन्मस्थळापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपला राजकीय उदय करून घेतला आहे. त्याचबरोबर चौंडीमध्ये राजकीय संघर्षही झालेले आहेत. चौंडी गाव शिवसेना-भाजप युतीच्या काळात, प्रथम १९९५ मध्ये प्रकाशझोतात आले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हजेरी लावत विकासकामांसाठी निधीची घोषणा केली. तेव्हापासून अहिल्यादेवींची पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित केला जाऊ लागला. तत्कालीन मंत्री अण्णा डांगे यांनी पुढाकार घेत चौंडीचा कायापालट करण्याचे काम सुरू केले.
दरम्यानच्या काळात यशवंत सेनेचे सरसेनापती व नंतरच्या काळातील राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी ३१ मे १९९६ रोजी अहिल्यादेवी यांची जयंती चौंडीत प्रथम साजरी केली. त्या वेळेपासून अहिल्यादेवींचा जयंती सोहळा साजरा करण्याचा पायंडा सुरू झाला. त्या निमित्ताने आमदार जानकर यांचा राजकीय उदय होण्यास मदत झाली. २००१ मधील जयंती सोहळ्यास तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे चौंडीत उपस्थित होते. त्यांच्याबरोबर जानकर यांचा संघर्ष झाला. पोलिसांनी जानकर यांना चौंडी गावाबाहेर अर्धा किलोमीटरवर कार्यक्रमास परवानगी दिली होती. नंतरच्या काळात सन २००७ पासून जयंतीनिमित्त चौंडी येथे येणाऱ्या भाविकांना भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केली. ती अद्यापही सुरू आहे. जानकर यांनी २०१३ मधील जयंती दिनी गोपीनाथ मुंडे व तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांना चौंडीला जयंती सोहळ्यास येण्याचे निमंत्रण दिले. त्याच्या पुढील वर्षी पुन्हा निमंत्रित केले. त्यानंतर जानकर यांनी २०१५ मधील जयंती महोत्सव साजरा केला, तो शेवटचा. त्यानंतर त्यांनी चौंडीऐवजी मुंबईत आझाद मैदानावर जयंती महोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. चौंडीतील जयंती महोत्सवाची धुरा २०१६ पासून तत्कालीन भाजपचे मंत्री चौंडीचे रहिवासी, अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज राम शिंदे यांनी सांभाळली. त्यांनी तत्कालीन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, खासदार छत्रपती संभाजीराजे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांना चौंडीत निमंत्रित केले होते.