मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून मुंबईत एकूण १ कोटी १ लाखाहून अधिक मतदार विधानसभेच्या निवडणुकीत मत नोंदवणार आहेत, तर १ लाख ६० हजार नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांपैकी ४७ लाख महिला असून सर्वाधिक महिला मतदार मालाडमध्ये आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात, तर २६ विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा १ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ४७ लाख महिला, तर ५४ लाख पुरुष मतदार आहेत. मुंबईत सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात आहेत, तर सर्वात कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात आहेत.
हेही वाचा : राज्यातील नावे वगळून बाहेरची दहा हजार नावे मतदार यादीत ; महाविकास आघाडीचा आरोप
मालाडमध्ये महिला मतदारांची सर्वाधिक संख्या
मुंबईत एकूण ४७ लाख महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांची संख्या १ लाख १२ हजारांच्या आसपास आहे. मात्र मालाड पश्चिममध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६७ हजार ७०७ इतकी आहे. वडाळ्यामध्ये एकूणच मतदारांची संख्या कमी असून या मतदारसंघातील महिला मतदारांची संख्याही कमी आहे. या मतदारसंघात ९९ हजार ५५३ महिला मतदार आहेत.
तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत वाढ
तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढत असून यंदा १,०७६ तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी उपनगरात ८३२ तृतीयपंथी मतदार आहेत. सर्वाधिक तृतीयपंथी मतदार मालाड पश्चिममध्ये आहेत.
हेही वाचा : व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ
८५ वर्षांवरील १ लाख ४७ हजार मतदार
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांपैकी ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध केली आहे. मुंबईत ८५ वर्षांवरील तब्बल १ लाख ४७ हजार मतदार आहेत. त्यापैकी ९३ हजार मतदार उपनगरांत आहेत.