संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांची आपले राजकीय उत्तराधिकारी म्हणून अधिकृत घोषणा केल्याने देशातील आणखी एका पक्षात घराणेशाहीचा उदय झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ मायावती यांनी भाच्याला उत्तराधिकारी नेमल्याने राजकारणातील आणखी एका भाच्याचे महत्त्व वाढले आहे.

मायावती यांनी आपल्या भावाचे पुत्र आकाश आनंद यांची आपले राजकीय उत्तराधिकारी असतील, असे पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत जाहीर केले. परेदशात शिकून आलेले २८ वर्षीय आकाश आनंद हे गेले काही महिने बसपात महत्त्वाची भूमिका बजावत होते. नुकत्याच विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंहणा या चार राज्यांमध्ये बसपाच्या प्रचाराची धुरा त्यांनी वाहिली होती. राजस्थानमध्ये आकाश आनंद यांनी विविध जिल्ह्यांमध्ये यात्राही काढली होती. परंतु चारही राज्यांमध्ये बसपाला यश मिळू शकले नाही. राजस्थानमध्ये पक्षाचे दोन आमदार निवडून आले असले तरी गत वेळच्या तुलनेत आमदारांची संख्या आणि मतांची टक्केवारी घटली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातही पक्षाची पाटी कोरी राहिली.

हेही वाचा… नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळावी म्हणून जेडीयूची धडपड; ‘इंडिया’वर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न?

मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपाची गेल्या पाच सात वर्षांत पीछेहाटच होत गेली. २००७ मध्ये स्वबळावर उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्य राज्याची सत्ता हस्तगत करणाऱ्या बसपाचा गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत फक्त एक आमदार निवडून आला. अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून गेले. पक्षाचा दिल्लीतील चेहरा म्हणून प्रसिद्धीस आलेले खासदार दानिश अली यांचीही दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाची हक्काची जाटव ही मतपेढीही भाजपकडे वळली. दलित समाजात मायावती यांच्याबद्दल फारसे आकर्षण राहिले नाही. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी मायावती यांनी राजकीय आव्हान दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दलित समाजाची एकजूट घडवून आणणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपकडे वळलेली दलित समाजातील मते पुन्हा बसपाकडे वळविण्याचे आव्हान आकाश आनंद यांच्यासमोर असेल.

आणखी एका भाच्याचा उदय

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले भाचे अभिषेक बॅनर्जी यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे आणले आहे. अभिषेक यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. मायावती यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी राजकीय उत्तराधिकाऱ्याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पक्षाच्या कारभारात सारे महत्त्वाचे निर्णय अभिषेक बॅनर्जी हे घेत असतता. ममतांचे भाचे असल्यानेच ईडी व सीबीआय या केंद्रीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी लागल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांकडून केला जातो.

हेही वाचा… चर्चेतील चेहरा : रेवंत रेड्डी यांचे स्वप्न अखेर साकार झाले…

घराणेशाहीची लागण

काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे घराणेशाही आहे. पंडित नेहृरू, इंदिरा गांधी, संजय व राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी अशी एकाच घराण्याकडे पक्षाची सूत्रे राहिली आहेत. घराणेशाहीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अन्य नेते नाके मुरडत असले तरी अलीकडेच कर्नाटकात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्राची नियुक्ती करून आपणही घराणेशाहीत मागे नाही हे भाजपने दाखवून दिले.

देशातील बहुतेक प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीतच पक्षाची वाटचाल झाली आहे. तेलुगू देशमचे एन. टी. रामाराव, जनता दलाचे देवेगौडा, द्रमुकचे करुणानिधी, अकाली दलाचे प्रकाशसिंग बांदल, नॅशनल काॅन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, पीडीपीचे मुफ्ती मोहमद सईद अशी यादी मोठी आहे. राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातही घराणेशाहीच बघायला मिळाली.

अन्य राज्यांमध्ये भाचेमंडळी राजकीय उत्तराधिकारी होत असताना राज्यात राजकीय उत्तराधिकारीपदावरून राज ठाकरे, अजित पवार आणि धनंजय मुंडे या तीन पुतण्यांनी काकांच्या विरोधात बंड केल्याची उदाहरणे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more dynasticism in political party bahujan samaj party chief mayawati officially announced her nephew akash anand as her political successor print politics news asj