तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) नेते एन चंद्राबाबू नायडू यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी आणि सध्याचे तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) खासदार नामा नागेश्वरा राव यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केली. खासदार नामा नागेश्वरा राव यांच्या मधुकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आणि प्रवर्तक यांच्या मालकीची ९६.२१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि इतर मालमत्ता मनी लाँड्रिंग प्रकरणात जप्त केल्या आहेत. खासदार नामा नागेश्वरा राव यांची एकूण संपत्ती ही ३३८ कोटी रुपये आहेत. ते देशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत.
६५ वर्षीय राव यांनी २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत खम्मममधून काँग्रेसच्या ताकदवान उमेदवार रेणुका चौधरी यांचा पराभव केला होता. त्यांनी १९८३ मध्ये मधुकॉन प्रोजेक्ट्सची स्थापना केली. कंपनी रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकाम क्षेत्रात होती. टीडीपीच्या पाठिंब्याने, राव यांनी या छोट्या कंपनीला पायाभूत सुविधांमध्ये काम करणाऱ्या मोठ्या कंपनीमध्ये रूपांतरित केले. मार्च २०१९ मध्ये राव यांनी तेलगू देसम पार्टीला सोडचिट्ठी सोडून टीआरएसमध्ये प्रवेश केला. त्याच महिन्यात, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मधुकॉन समूहाच्या कार्यालयांवर छापे टाकले. या कंपनीवर अनेक वेळा निधी पळवल्याचा आरोप केला गेला आहे. या वेळी कंपनीवर रांची-रारगाव-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी दिलेले २६० कोटींहून अधिक रुपये वळवल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. त्याच एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
या धाड सत्रात राव यांच्या घरातून ३४ लाख रुपयांची रोख रक्कम आणि बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की मेसर्स रांची एक्सप्रेसवेज लिमिटेडचे संचालक आणि प्रवर्तकांनी कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून १३०३ कोटी (अंदाजे) कर्ज घेतले. मधुकॉन ग्रुपने कर्जाची संपूर्ण रक्कम आपल्या नमूद केलेल्या उद्देशांसाठी वापरली नाही. ती रक्कम त्याच्याशी संबंधित संस्थांकडे वळवली आणि इतर कामांसाठी वापरली. त्याच्या संबंधित शेल संस्थांना बोगस कामे देऊन थेट कर्ज काढून टाकले. राव यांचे टीडीपी आणि आता टीआरएसमधील मित्र त्यांचे वर्णन अतिशय साधे व्यक्ती म्हणून करतात. “ते तेलंगणातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत पण ते त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन कधीच करत नाहीत. ते अतिशय साधेपणाने जगतात. केले, ”टीआरएसमधील एका सहकाऱ्याने सांगितले.