सौरभ कुलश्रेष्ठ
सरकारी कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी संभाषणावेळी ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे अशी कल्पना सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली खरी पण अमलबजावणी वेळी तो निर्धार मवाळ झाला आहे. ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचे हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर केवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि तेही ऐच्छिक करण्यात आले आहे.
हेही वाचा- प्रश्नांवर समाधान करण्याची जागा विधानसभेचे सभागृह; विधानसभा अध्यक्षांचे दालन नव्हे
मागील सरकारमध्ये अर्थमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपानंतर काही दिवसात एका कार्यक्रमात बोलताना सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘हॅलो’ या शब्दाऐवजी ‘वंदे मातरम’ हा शब्द वापरावा असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावरून बरीच चर्चा आणि विनोदही झाले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- जयंत पाटलांना शह देताना भाजपमधील फुटीचे दर्शन
‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ याबाबतचा प्रत्यक्ष शासन आदेश (जीआर) आता जाहीर झाला आहे. तो सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही तर केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीतील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. इतकेच नव्हे तर दूरध्वनीवरील संभाषणावेळी ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ या शब्दाचा करणे ऐच्छिक आहे. तसे आवाहन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ बाबतचा आग्रही सूर मवाळ झाल्याचे दिसत आहे.