मुंबई : लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने झालेला गोंधळ लक्षात घेता मतदान केंद्रांची संख्या वाढवावी या राजकीय पक्षांच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रात १५०० पर्यंतच मतदार असावेत, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना तसेच राजकीय पक्षांकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात विविध सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर १५०० पर्यंत मतदार ठेवण्याबाबत सूचना असल्याने जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र तयार करावे, अशी सूचना करण्यात आली.

हेही वाचा >>>शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी

सूचना काय?

● नवीन मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये असणे आवश्यक आहेत. ज्या इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील आणि अशा मतदान केंद्रांची व संबंधित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असमान असेल, अशा प्रकरणी वाढीव मतदार असलेल्या मतदान केंद्रातील वाढीव मतदार स्थलांतरित करताना विशेष दक्षता घ्यावी.

● तेथे नवीन मतदान केंद्र तयार करावे किंवा वाढीव मतदार त्याच इमारतीतील अन्य केंद्रांमध्ये स्थलांतरित करावे.

● वाढीव मतदार दुसऱ्या इमारतीतील कोणत्याही मतदान केंद्रास जोडू नयेत. तसेच असे स्थलांतर करताना वस्ती/ मोहल्ल्यातील मतदार एकत्र राहतील, तसेच कुटुंब विभागले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

● भौगोलिक सलगता कायम राहील याचीही दक्षता घ्यावी.